Samas 3
समास 3 - शारदास्तवननाम
समास 3 - दशक १
दासबोध दशक पहिला – समास तिसरा : शारदास्तवन ॥ श्रीराम ॥
आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥
जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥
जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी ।
जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या ।
जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥
जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती ।
जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥
जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी ।
आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे ।
जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥
जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा ।
जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥
जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा ।
जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥
जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा ।
हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती ।
जे कळीकाळाची नियंती । सद्गु रुकृपा ॥ ११॥
जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥
ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली ।
सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥
तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥
जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी ।
सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥
जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ ।
निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥
जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं ।
जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥
जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण ।
जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥
शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती ।
नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥
जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा ।
जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥
नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥
जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी ।
जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥
जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी ।
जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥
जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें ।
जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥
स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥
म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर ।
तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥