Samas 7
समास 7 - कवेश्वरस्तवननाम
समास 7 - दशक १
दासबोध दशक पहिला – समास सातवा : कवेश्वरस्तवन ॥ श्रीराम ॥
आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥
कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व ।
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥
कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर ।
नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥
अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी ।
नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥
कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु ।
नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु ।
नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥
कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण ।
मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥
कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ।
नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥
कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन ।
कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥
कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो ।
कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥
कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण ।
नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति ।
कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥
नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ ।
नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥
आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस ।
कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥
कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता ।
कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥
कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद ।
कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥
कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार ।
सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥
कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण ।
नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥
कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते ।
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥
नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार ।
म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं ।
कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥
मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक ।
तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥
पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली ।
तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥
ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार ।
आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥
नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती ।
वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥
परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥
सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।
नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥
कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें ।
नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥
कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें ।
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं ।
विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥
कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥
कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड ।
ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥
आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर ।
तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥