Samas 9
समास ९ - समास नववा : पुरुषप्रकृति
समास ९ - दशक १०
समास नववा : पुरुषप्रकृति॥ श्रीराम ॥
आकाशीं वायो जाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण ।
त्या वायोमधें त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ १ ॥
वटबीजीं असे वाड । फोडून पाहातां न दिसे झाड ।
नाना वृक्षांचे जुंबाड । बीजापासून होती ॥ २ ॥
तैसी बीजरूप मुळमाया । विस्तार जाला तेथुनियां ।
तिचें स्वरूप शोधुनियां । बरें पाहावें ॥ ३ ॥
तेथें दोनी भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचिती ।
निश्चळीं जे चंचळ स्थिती । तोचि वायो ॥ ४ ॥
तयामधें जाणीवकळा । जगज्जोतीचा जिव्हाळा ।
वायो जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥
सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहातां पाणीच असे ।
विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥
वायो जाणीव जगज्जोती । तयास मूळमाया म्हणती ।
पुरुष आणी प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥
वायोस म्हणती प्रकृती । आणी पुरुष म्हणती जगज्जोती ।
पुरुषप्रकृती शिवशक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥
वायोमधें जाणीव विशेष । तेंचि प्रकृतुमधें पुरुष ।
ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे॥ ९॥
वायो शक्ति जाणीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर ।
लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥
वायोमधें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण ।
तयापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ११
॥
तया गुणामधें सत्वगुण । निखळ जाणीवलक्षण ।
त्याचा देहधारी आपण । विष्णु जाला ॥ १२ ॥
त्याच्या अंशे जग चाले । ऐसे भगवद्गीता बोले।
गुंतले तेंचि उगवले । विचार पाहातां ॥ १३ ॥
येक जाणीव वांटली । प्राणीमात्रास विभागली ।
जाणजाणों वांचविली । सर्वत्र काया ॥ १४ ॥
तयेंचे नांव जगज्जोती । प्राणीमात्र तिचेन जिती ।
याची रोकडी प्रचिती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥
पक्षी श्वापद किडा मुंगी । कोणीयेक प्राणी जगीं ।
जाणीव खेळे त्याच्या आंगीं । निरंतर ॥१६ ॥
जाणोनी काया पळविती । तेणें गुणें वांचती ।
दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥
आवघ्या जगस वांचविती । म्हणोन नामें जगज्जोती ।
ते गेलियां प्राणी मरती । जेथील तेथें॥ १८॥
मुळींचे जाणीवेचा विकार । पुढें जाला विस्तार ।
जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणु ॥ १९ ॥
तैसे देव देवता भूतें । मिथ्या म्हणोनये त्यांतें ।
आपलाल्या सामर्थ्यें ते । सृष्टीमधें फिरती ॥ २० ॥
सदा विचरती वायोस्वरूपें । स्वैछा पालटिती रूपें ।
अज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें त्यास । बाधिती ॥ २१ ॥
ज्ञात्यास संकल्पेचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना ।
याकारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥
अभ्यासिलिया आत्मज्ञान। सर्वकर्मास होये खंडण ।
हे रोकडी प्रचित प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥
ज्ञानेविण कर्म विघडे । हें तों कदापि न घडे ।
सद्गुेरुवीण ज्ञान जोडे । हेंहि अघटीत ॥ २४ ॥
म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा ।
तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५॥
तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वता ।
अनन्यभावें सार्थकता । सहजचि जाली ॥ २६ ॥
विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।
म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥
विचार पाहेल तो पुरुषु । विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८
॥
सिद्धांत साधायाकारणें । पूर्वपक्ष लागे उडवणें ।
परंतु साधकां निरूपणें । साक्षात्कार ॥ २९
॥
श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्वास ।
रोकड साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे
पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥