उपासना

Samas 7

समास 7 - समास सातवा : चंचळ नदीनिरूपणनाम

समास 7 - दशक ११

समास सातवा : चंचळ नदीनिरूपणनाम॥ श्रीराम ॥

चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा ।

प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥

केवळ अचंचळीं निर्माण जाली । अधोमुखें बळें चालिली ।

अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणीं ॥ २ ॥

वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे ।

लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ॥ ३ ॥

शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।

चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥

फेण फुगे हेलावे । सैरावैरा उदक धावे ।

थेंब फुई मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥

वोसाणे वाहती उदंड । झोतावे दर्कुटे दगड ।

खडकें बेटें आड । वळसा उठे ॥ ६ ॥

मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या ।

ठाईं ठाईं उदंड पाहिल्या । सृष्टीमधें ॥ ७ ॥

येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले ।

येक सांकडींत आडकले । अधोमुख ॥ ८ ॥

येक आपटआपटोंच गेली । येक चिरडचिर्दोंच मेलीं ।

कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥

येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले ।

उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरूप ॥ १० ॥

तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें ।

उफराटी गंगा पाहातां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥

त्या जळाऐसें नाही निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ ।

आपोनारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥

माहानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं ।

स्वर्गमृत्युपाताळी । पसरली पाहा ॥ १३ ॥

अधोर्ध अष्टहि दिशा । तिचें उदक करी वळसा ।

जाणते जाणती जगदीशा । सारिखीच ते ॥

१४ ॥

अनंत पात्रीं उदक भरलें । कोठें पाझपाझरोंच गेलें ।

कितीयेक तें वेचलें । संसारासी ॥ १५ ॥

येक्यासंगे तें कडवट । येक्यासंगें तें गुळचट ।

येक्यासंगे ते तिखट । तुरट क्षार ॥ १६

ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे ।

सखोले भूमीस तुंबळे । सखोलपणें ॥ १७

विषामधें विषचि होतें । अमृतामधें मिळोन जाते ।

सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥

गुणीं अवगुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे ।

त्या उदकाचा महिमा न कळे । उदकेंविण ॥ १९ ॥

उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर ।

जळवास करून नर । राहिले कितीयेक ॥ २० ॥

उगमापैलिकडे गेले । तेथें परतोन पाहिलें ।

तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ॥ २१ ॥

वृत्तिसुन्य योगेश्वर । याचा पाहावा विचार ।

दास म्हणे वारंवार । किती सांगों ॥ २२ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

चंचळ नदीनिरूपणनाम समास सातवा ॥

20px