Samas 3
समास 3 - समास तिसरा : भक्तनिरूपण
समास 3 - दशक १२
समास तिसरा : भक्तनिरूपण॥ श्रीराम ॥
पृथ्वीमधें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक ।
इहलोक आणि परलोक । बरा पाहावा॥ १ ॥
इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें ।
परलोक साधायाकारणें । सद्गुसरु पाहिजे ॥ २ ॥
सद्गु रुसी पाय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें ।
अनन्यभावें येकभावें । दोनी गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥
दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण ।
या गोष्टींचे विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥
आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण ।
पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥
सकळ केलियाचें फळ । शाश्वत वोळखावें निश्चळ ।
आपण कोण का केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥
सारासार विचार घेतां । पदास नाहीं शाश्वतता ।
आधी कारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥
निश्चळ चंचळ आणि जड । अवघा मायेचा पवाड ।
यामधें वस्तु जाड । जाणार नाहीं ॥ ८ ॥
तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें ।
माईक विचार खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥
खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें ।
मायेचें अवघेचि जाणावें । रूप माईक ॥ १० ॥
पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया ।
पिंडब्रह्मांड अष्टकाया । नसिवंत ॥ ११ ॥
दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल ।
रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥
वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुलें जाईल ।
भूतांस भूत खाईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥
देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचिती ।
मनुष्येंविण उत्पत्ति । रेत कैंचें ॥ १४ ॥
अन्न नस्तां रेत कैंचें । वोषधी नस्तां अन्न कैंचें ।
वोषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नस्तां ॥ १५ ॥
आप नस्तां पृथ्वी नाहीं । तेज नस्तां आप नाहीं ।
वायो नस्तां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥
अंतरात्मा नस्तां वायो कैंचा । विकार नस्तां अंतरात्मा कैंचा ।
निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥
पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायो नाहीं ।
अंतरात्मा विकार नाहीं । निर्विकारीं ॥ १८ ॥
निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
अष्टधा प्रकृति संपूर्ण । नासिवंत ॥ १९ ॥
नासिवंत समजोन पाहिलें । तों तें अस्तांचि नस्तें जालें ।
सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥
विवेकें पाहिला विचार । मनास आलें सारासार ।
येणेंकरितां विचार । सदृढ जाला ॥ २१ ॥
शाश्वत देव तो निर्गुण । ऐसीं अंतरीं बाणली खूण ।
देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ ॥
मी कोण पाहिजे कळलें । देहतत्व तितुकें शोधिलें ।
मनोवृत्तीचा ठाईं आलें । मीतूंपण ॥ २३ ॥
सकळ देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहातां ।
मीतूंपण हें तत्वता । तत्वीं मावळलें ॥ २४ ॥
दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वें तत्व तेव्हां सरे ।
मीतूंपण हें कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥
पंचीकर्ण तत्वविवर्ण । माहावाक्यें वस्तु आपण ।
निसंगपणें निवेदन । केले पाहिजे ॥ २६ ॥
देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।
उपाधिवेगला केवळ । निरोपाधी आत्मा ॥ २७ ॥
मीपण तें बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें ।
निवृत्तिपदास प्राप्त जालें । उन्मनीपद ॥ २८ ॥
विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येये राहिलें ध्यान ।
सकळ कांहीं कार्याकारण । पाहोन सांडिलें ॥ २९ ॥
जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें ।
येमयातनेचें जालें । निसंतान ॥ ३० ॥
निर्बंद अवघाचि तुटला । विचारें मोक्ष प्राप्त जाला ।
जन्म सार्थकचि वाटला । सकळ कांहीं ॥ ३१ ॥
नाना किंत निवारले । धोके अवघेचि तुटले ।
ज्ञानविवेकें पावन जालें । बहुत लोक ॥ ३२ ॥
पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास ।
ऐसी हे प्रचित मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भक्तनिरूपणनाम समास तिसरा ॥