Samas 8
समास 8 - समास आठवा : काळरूपनिरूपण
समास 8 - दशक १२
समास आठवा : काळरूपनिरूपण॥ श्रीराम ॥
मूळमाया जगदेश्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।
सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसें गगन अंतराळ ।
निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥
उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।
येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाही ॥ ३ ॥
येक चंचळ येक निश्चल । यावेगळा कोठें काळ ।
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥
आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।
त्या विलंबरूप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥
सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥
पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।
शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥
क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।
देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥
ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट ।
दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥
मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥
असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥
उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।
आद्यंत अवघा काळ । विलंबरूपी ॥ १२ ॥
जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥
प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।
सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥
प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।
पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥
जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥
सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।
सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥
प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्धमुखें ।
ऊर्धमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥
ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।
विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥
प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।
प्रारब्धयोगें करून राहे । लोकांमधें ॥ २१ ॥
सकळांचे येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।
विवेकें करून तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥
तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।
कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥
विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।
त्यांचे ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥
बरें आमचें काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।
पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥
पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।
देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥
कीर्ति करून नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।
शाहाणे होऊन भुलले । काये सांगवें ॥ २७ ॥
येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास हेतें ।
कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥
पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।
येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥
जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं ।
संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥
मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥
राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबुल जाला ।
तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥
ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें ।
नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥
हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।
तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
काळरूपनिरूपणनाम समास आठवा ॥