Samas 3
समास 3 - समास तिसरा : उभारणीनिरूपण
समास 3 - दशक १३
समास तिसरा : उभारणीनिरूपण॥ श्रीराम ॥
ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहून विशाळ ।
निर्मळ आणि निश्चळ । निर्विकारी ॥ १ ॥
ऐसेंचि असतां कित्येक काळ । तेथें आरंभला भूगोळ ।
तया भूगोळांचे मूळ । सावध ऐका ॥ २ ॥
परब्रह्म असतां निश्चळ । तेथें संकल्प उठिला चंचळ ।
तयास बोलिजे केवळ । आदिनारायेण ॥ ३ ॥
मूळमाया जगदेश्वर । त्यासीच म्हणिजे शड्गुणैश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥
ऐलिकडे गुणक्षोभिणी । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं ।
मूळ वोंकाराची मांडणी । तेथून जाणावी ॥ ५ ॥
अकर उकार मकार । तिनी मिळोन वोंकार ।
पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥
आकाश म्हणिजेतें अंतरात्म्यासी । तयापासून जन्म वायोसी ।
वायोपासून तेजासी । जन्म जाला ॥ ७ ॥
वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्हि पेटे ।
सूर्यबिंब तें प्रगटे । तये ठाईं ॥ ८ ॥
वारा वाजतो सीतळ । तेथें निर्माण जालें जळ ।
तें जळ आळोन भूगोळ । निर्माण जाला ॥ ९ ॥
त्याअ भूगोळाचे पोटीं । अनंत बीजांचिया कोटी ।
पृथ्वी पाण्या होता भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥
पृथ्वी वल्ली नाना रंग । पत्रें पुष्पांचे तरंग ।
नाना स्वाद ते मग । फळें जाली ॥ ११॥
पत्रें पुष्पें फळें मुळें । नाना वर्ण नाना रसाळें।
नाना धान्यें अन्नें केवळें । तेथून जालीं ॥ १२॥
अन्नापासून जालें रेत । रेतापासून प्राणी निपजत ।
ऐसी हे रोकडी प्रचित । उत्पत्तीची ॥ १३ ॥
अंडज जारज श्वेतज उद्वीज । पृथ्वी पाणी सकळांचे बीज ।
ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥
च्यारि खाणी च्यारि वाणी । चौयासि लक्ष जीवयोनी ।
निर्माण झाले लोक तिनी । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
मुळीं अष्टधा प्रकृती । अवघे पाण्यापासून जन्मती ।
पाणी नस्तां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥
नव्हे अनुमानाचें बोलणें । याचा बरा प्रत्ययें घेणें ।
वेदशास्त्रें पुराणें । प्रत्ययें घ्यावीं ॥ १७ ॥
जें आपल्या प्रत्यया येना । तें अनुमानिक घ्यावेना ।
प्रत्ययाविण सकळ जना । वेवसाये नाहीं ॥ १८॥
वेवसाये प्रवृत्ती निवृत्ती । दोहिंकडे पाहिजे प्रचिती ।
प्रचितीविण अनुमानें असती। ते विवेकहीन ॥ १९ ॥
ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकळित बोलिला प्रकार ।
आतां विस्ताराचा संहार । तोहि ऐका ॥ २० ॥
मुळापासून सेवटवरी । अवघा आत्मारामचि करी ।
करी आणि विवरी । येथायोग्य ॥ २१ ॥
पुढेंसंव्हार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला ।
इतुक्याउपरी जाला । समास पूर्ण ॥ २२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उभारणिनिरूपणनाम समास तिसरा ॥