उपासना

Samas 1

समास 1 - समास पहिला : निस्पृहलक्षणनाम

समास 1 - दशक १४

समास पहिला : निस्पृहलक्षणनाम

॥ श्रीराम ॥

ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।

जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥

सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत ।

साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥

तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये प्राप्ती ।

शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥

निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये ।

सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥

कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये ।

धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥

येकेस्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये ।

द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥

आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।

उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥

भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।

पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥

धड मळिन नेसों नये । गोड अन्न खाऊं नये ।

दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥

भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये ।

पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥

विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये ।

ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥

करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ॥

प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥

पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये ।

समैं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥

अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये ।

धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्या ॥ १४ ॥

लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजों नये ।

खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥

शुद्ध मार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये ।

समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥

तपीळपण धरूं नये । भांडवितां भांडों नये ।

उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥

हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये ।

चालवितां चालों नये । क्षणक्ष्णा ॥ १८ ॥

येक वेष धरूं नये । येक साज करूं नये ।

येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥

सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये ।

सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥

नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये ।

अंगीकार करूं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥

नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये ।

परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥

स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये ।

परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥

वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये ।

येकांत मोडूं देऊं नये । स्वरूपस्थितीचा ॥ २४ ॥

अनर्गळता करूं नये । लोकलाज धरूं नये ।

कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥

परंपरा तोडूं नये । उआपाधी मोडूं देऊं नये ।

ज्ञानमार्गे सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥

कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये ।

साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥

अतिवाद करूं नये । अनित्य पोटीं धऊं नये ।

रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥२८॥

न मनी त्यास सांगों नये। कंटाळवाणें बोलों नये ।

बहुसाल असो नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥

कांहीं उपाधी करूं नये । केली तरी धरूं नये ।

धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें॥ ३० ॥

थोरपणें असो नये । महत्त्व धरून बैसों नये ।

कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥

साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये ।

बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥

अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये ।

कानकोंडा करूं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥

कठीण वैराग्य सोडूं नये । कठीण अभ्यास सांडूं नये ।

कठिणता धरूं नये । कोणेकेविशैं ॥ ३४ ॥

कठीण शब्द बोलों नये । कठीण आज्ञा करूं नये ।

कठीण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५॥

आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये ।

बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥

उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करूं नये ।

शाक्तमार्गें भरों नये । मुक्तपणें भरीं ॥ ३७ ॥

नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये ।

क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥

थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये ।

अप्रमाण वर्तों नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥

कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्चये करूं नये ।

सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥

सावधपण सोडुं नये । व्यापकपण सांडुं नये ।

कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥

विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थआज्ञा करूं नये ।

केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥

प्रसंगेंवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये ।

विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३॥

परोपकार सांडूं नये । परपीडा करूंनये ।

विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥

नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये ।

द्रव्यासाठीं हिंडों नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥

संशयात्मक बोलों नये । बहुत निश्चये करूं नये ।

निर्वाहेंवीण धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥

जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।

सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥

ज्ञानगर्व धरूं नये । सहसा छळणा करूं नये ।

कोठें वाद घालुं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥

स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारीं पडों नये ।

कार्यकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥

कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये ।

भिक्षेसाथीं सांगों नये । परंपरा आपुली ॥५० ॥

सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये ।

प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥

प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये ।

पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥

श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें ।

भोग राहात बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥

तेथें निस्पृहें जाऊं नये । त्याचें अन्न खाऊं नये ।

येळिलवाणें करूं नये । आपणासी ॥ ५४ ॥

लग्नमुहुर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये ।

मोलें कीर्तन करूं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥

आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये ।

निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥

मोलें सुकृत करूं नये । मोलपुजारी होऊं नये ।

दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥

कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये ।

मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥

निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न सांपडावें ।

परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥

प्रेत्नेंविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये ।

देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥

उपाधीमध्यें पडों नये । उपाधी आंगीं जडों नये ।

भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥

बहु उपाधी करूं नये । उपाधीविण कामा नये ।

सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥

बहुसाल धांवों नये । बहुसाल साहों नये ।

बहुत कष्ट करूं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥

बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये ।

बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥

बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडुं नये ।

बहुत नेम धरूं नये । बाश्कळ खोटें ॥ ६५ ॥

बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये ।

बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥

बहु संग धरूं नये । संतसंग सांडुं नये ।

कर्मठपण कामा नये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥

बहु लोकिक सांडुं नये । लोकाधेन होऊं नये ।

बहु प्रीती कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥

बहु संशये धरूं नये । मुक्तमार्ग कामा नये ।

बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥

बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये ।

देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥

वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये ।

आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥

मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये ।

अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥

मनबुद्धिअगोचर । बुद्धीवीण अंधकार ।

जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥

ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंवीण कामा नये ।

अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥

दृश्यस्मरण काम नये । विस्मरण पडों नये ।

कांहीं चर्चा करूं नये । केलियावीण न चले ॥ ७५ ॥

जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करूं नये ।

आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥

आशाबद्धत बोलों नये । विवेकेंवीण चालों नये ।

समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥

अबद्ध पोथी लेहों नये । पोथीवीण कामा नये ।

अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥

निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।

श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥

हें सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती ।

आंगीं बाणें महंती । अकस्मात ॥ ८० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥

20px