उपासना

Samas 10

समास 10 - समास दहावा : मायानिरूपण

समास 10 - दशक १४

समास दहावा : मायानिरूपण॥ श्रीराम ॥

माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे ।

माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥

करंटा पडोनि उताणा । करी नानापरी कल्पना ।

परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥

द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव ।

क्षणीक वाटे परी भाव । तैसी माया ॥ ३ ॥

गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें ।

नाना रूपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥

लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची ।

मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥

दसयाचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे ।

परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥

मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढविणें ।

मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥

राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भरदोरी लक्षुमी ।

तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥

मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री ।

कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया ॥ ९ ॥

दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा ।

नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥

बहुरूपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव ।

कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥

देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना ।

नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥

सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें ।

कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥

मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा ।

नातरी डोळसेचा डोळा । फुटला जैसा ॥ १४ ॥

मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकीचें नाम कासी ।

बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥

साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार ।

उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥

श्रवण बोटें संधी करतळ । रविरश्में दिसती इंगळ ।

रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥

भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला ।

विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥

जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें जिरकोळें ।

विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥

भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली ।

सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥

कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र ।

अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

मायानिरूपणनाम समास दहावा ॥

॥ दशक चवदावा समाप्त ॥

20px