Samas 2
समास 2 - समास दुसरा : भिक्षानिरूपण
समास 2 - दशक १४
समास दुसरा : भिक्षानिरूपण
॥ श्रीराम ॥
ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।
वोंभवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥
भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला ।
प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥
संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन ।
तेनें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥
॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः ।
असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥
ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा ।
ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥
दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं ।
निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥
वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला ।
तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥
आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें जालें ।
प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥
नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें ।
तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥
अखंड भिक्षेच अभ्यास । तयास वाटेना परदेश।
जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥
भिक्षां मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजो नये ।
भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥
भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर ।
कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥
भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु ।
भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥
भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती ।
सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥
भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिति । भिक्षेनें प्रगटे महंती ।
स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥
भिक्षेस नाहीं आडथळा । भिक्षाहारी तो मोकळा ।
भिक्षेकरितां सार्थक वेअळा । काळ जातो ॥ १५ ॥
भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगवली ।
अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥
पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना ।
कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥
गोरज्य वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी ।
विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥
भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य ।
वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥
कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें ।
बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥
सुखरूप भिक्षा मागणें । ऐसी निस्पृहतेचीं लक्षणें ।
मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥
ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती ।
भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भिक्षानिरूपणनाम समास दुसरा ॥