Samas 3
समास 3 - समास तिसरा : कवित्वकला निरूपण
समास 3 - दशक १४
समास तिसरा : कवित्वकला निरूपण॥ श्रीराम ॥
कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा ।
तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ॥ १ ॥
ऐसी माळा अंतःकरणीं । गुंफुन पूजा रामचरणीं ।
वोंकारतंत अखंडपणीं । खंडूं च नये ॥ २ ॥
परोपकाराकारणें । कवित्व अगत्य करणें ।
तया कवित्वाचीं लक्षणें । बोलिजेती ॥ ३ ॥
जेणें घडे भगवद्भकक्ती । जेणें घडे विरक्ती ।
ऐसिया कत्वाची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥
क्रियेवीण शब्दज्ञान । तया न मानिती सज्जन ।
म्हणौनी देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥
देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें ।
तें तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नाव प्रासादिक ॥ ६ ॥
धीट पाठ प्रसादिक । ऐसें बोलती अनेक ।
तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥
धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें ।
बळेंचि कवित्व रचिलें । या नाव धीट बोलिजे ॥ ८ ॥
पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर ।
तयासरिखा उतार । आपणचि केला ॥ ९ ॥
सीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टि पडिलें तें चि वर्णिलें ।
भक्तिवांचून जें केलें । त्या नाव धीटपाठ ॥ १० ॥
कामिक रसिक श्रृंघारिक । वीर हास्य प्रस्ताविक ।
कौतुक विनोद अनेक । या नाव धीटपाठ ॥ ११ ॥
मन जालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार ।
धीटपाठें परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥
व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती ।
तेथें केली जे वित्पत्ति । त्या नाव धीटपाठ ॥ १३ ॥
कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट ।
कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत ॥ १४ ॥
कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग ।
कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥ १५ ॥
कवित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ ।
कवित्व नसावें कुटीळ । लक्षुनियां ॥ १६ ॥
हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें ।
छंदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७ ॥
वित्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।
भक्तिज्ञानवैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥
भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत ।
आवडीहीन जें वगत्रृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥
भक्तिविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद ।
प्रीतीविण संवाद । घडे केवी ॥ २० ॥
असो धीट पाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेचें पिसें ।
आतां प्रसादिक तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥
वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥
जयास घडीनें घडी । लागे भगवंतीं आवडी ।
चढती वाढती गोडी । भगद्भसजनाची ॥ २३ ॥
जो भगवद्भीजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण ।
सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥
जया अंतरी भगवंत । अचळ राहिला निवांत ।
तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥
अंतरी बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद ।
भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥
आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी ।
भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥
भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान ।
शंका लज्या पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥
तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला ।
तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥
गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक ।
दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥
ऐसा भगवंतीं रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला ।
स्वैछा वर्णूं लागला । ध्यान कीर्ती प्रताप ॥ ३१ ॥
नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।
तयापुढें नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥
असो ऐसा भगवद्भेक्त । जो ये संसारीं विरक्त ।
तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥
त्याचे भक्तीचें कौतुक । तयानव प्रसादिक ।
सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥
ऐका कवित्वलक्षण । केलेंच करूं निरूपण ।
जेणे निवे अंतःकर्ण । श्रोतयांचें ॥ ३५ ॥
कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ ।
कवित्व असावें प्रांजळ । अन्वयाचें ॥ ३६
॥
कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थागळें ।
कवित्व असावें वेगळें । अहंतेसी ॥ ३७ ॥
कवित्व असावें कीर्तिवाड । कवित्व असावें रम्य गोड ।
कवित्व असावें जाड । प्रतापविषीं ॥ ३८ ॥
कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्परूपें ।
कवित्व असावें सुल्लपें । चरणबंद ॥ ३९ ॥
मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्भुचत विशाळ ।
गौल्य माधुर्य रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥
अक्षरबंद पदबंद । नाना चातुर्य प्रबंद ।
नाना कौशल्यता छंदबंद । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥
नाना युक्ती नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी ।
नाना अन्वये साधी । नाना कवित्व ॥ ४२ ॥
नाना साहित्य दृष्टांत । नाना तर्क धात मात ।
नाना संमती सिद्धांत । पूर्वपक्षेंसीं ॥ ४३ ॥
नाना गती नाना वित्पत्ती । नाना मती नाना स्फुर्ति ।
नाना धारणा नाना धृती । या नाव कवित्व ॥ ४४ ॥
शंका आशंका प्रत्योत्तरें । नाना काव्यें शास्त्राधारें ।
तुटे संशये निर्धारें । दिर्धारितां ॥ ४५ ॥
नाना प्रसंग नाना विचार । नाना योग नाना विवर ।
नाना तत्वचर्चासार । या नाव कवित्व ॥ ४६ ॥
नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटणें ।
नाना संदेह फेडणें । या नाव कवित्व ॥ ४७ ॥
जेणें अनुताप उपजें । जेणें लोकिक लाजे ।
जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व ॥ ४८ ॥
जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ती हे मावळें ।
जेणें भक्तिमार्ग कळे । या नाव कवित्व ॥ ४९ ॥
जेणें सद्बुवद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे ।
जेणें भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ॥ ५० ॥
जेणें सद्बुतद्धि लागे । जेणें पाषांड भंगे ।
जेणें विवेक जागे । या नाव कवित्व ॥ ५१ ॥
जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे ।
जेणें भिन्नत्व नासे । या नाव कवित्व ॥ ५२ ॥
जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन ।
जया मानिती सज्जन । तया नाव कवित्व ॥ ५३ ॥
ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण ।
परंतु कांहींयेक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवित्वकला निरूपण समास तिसरा ॥