उपासना

Samas 4

समास 4 - समास चौथा : कीर्तन लक्षण

समास 4 - दशक १४

समास चौथा : कीर्तन लक्षण॥ श्रीराम ॥

कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें ।

कठीण कर्कश कुर्टें सांडावें । येकीकडे ॥ १ ॥

खटखट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी ।

खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ति आपुली ॥ २ ॥

गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये ।

गोप्य गुज गर्जों नये । गुण गावे ॥ ३ ॥

घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरूं घसा खाणें ।

घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥

नाना नामे भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाचीं ।

नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुसत करावीं ॥ ५ ॥

चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।

चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥

छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नयें ।

छळणें छळणा करूं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥

जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना ।

जपजपों जनींजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥

झिरपे झरे पझरे जळ । झळके दुरुनी झळाळ ।

झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥

या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे ।

या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥

टक टक टक टक करूं नये । टाळाटाळी टिकों नये ।

टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥

ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना ।

ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥

डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये ।

डंडळ डंडळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥

ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसकण डुले नाचे ।

ढळेचिना ढिगढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥

नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर ।

नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥

ताळ तुंबरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें ।

तूर्त तार्किक तनें मनें । तल्लिन होती ॥ १६ ॥

थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच।

थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७

दक्षदाक्षण्य दाटलें । बंदें प्रबंदें कोंदाटलें ।

दमदम दुमदुमों लागलें । जगदंतर ॥ १८ ॥

धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला ।

धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥

नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।

नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥

पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी ।

परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥

फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं ।

फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥

बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती ।

बळें बळेंचि बळाविती

। कथेलागीं ॥ २३ ॥

भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं ।

भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥

मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें ।

मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥

येकें टोकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं ।

या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥

राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें ।

रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥

लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन।

लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥

वचनें वाउगीं वदेना । वावरेविवरे वसेना ।

वगत्रुत्वें निववी जना । विनित हौनी॥ २९॥

सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला।

साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥

खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें ।

खोटें खोटेपणें गेलें। खोटें म्हणोनियां ॥३१ ॥

शाहाणे शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रृती बोधेना ।

शुक शारिकाशमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥

हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला ।

हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥

लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी ।

लंगलें लयेतें अलक्षी । विहिंगममार्गें ॥ ३४॥

क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमा क्षमून क्ष्मवितो ।

क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

कीर्तन लक्षण निरूपण समास चौथा ॥

20px