उपासना

Samas 6

समास 6 - समास सहावा : चातुर्य लक्षण

समास 6 - दशक १४

समास सहावा : चातुर्य लक्षण॥ श्रीराम ॥

रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।

कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥

काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्ना चालेना ।

मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥

आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना ।

पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥

कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोनि सांगणें ।

रूप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥

अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभासितां येती ।

कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥

मूर्खपण सांडितां जातें । शाहाणपण सिकतां येतें ।

कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥

मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी ।

चातुर्येंविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥

ऐसी प्रचीत येते मना । तरी कां स्वहित कराना ।

सन्मार्गें चालतां जनां । सज्जना माने ॥ ८ ॥

देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येंविण नासलें ।

गुणेंविण साजिरें केलें । बष्कळ जैसें ॥ ९ ॥

अंतर्कळा श्रृंघारावी । नानापरी उमजवावी ।

संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥

प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टविना ।

उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥

आपण दुसयास करावें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।

जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥

न्यायें वर्तेल तो शहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा ।

नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥

जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें ।

येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥

लोक आपणासि वोळावे । किंवा आवघेच कोंसळावे ।

आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥

समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे ।

मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥

अहो कांहो अरे काअंरे । जनीं ऐकिजेतें किं ते ।

कळत असतांच कां रे । निकामीपन ॥ १७ ॥

चातुर्यें श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर ।

दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥

बाह्याकार श्रुंगारिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें ।

चातुर्यें बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।

समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥

तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें ।

उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥

लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे ।

लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥

म्हणोन दुरयास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें ।

दुसयास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥

हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये ।

समजणें हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥

समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।

यावेगळे उरले । तें करंटे पुरुष ॥ २५ ॥

जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।

समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥

आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो ।

दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥

मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु ।

बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥

आपणास शाहाणें करूं नेणें । आपलें हित आपण नेणें ।

जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥

ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान ।

तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥

आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला ।

बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥

बहुतांचे मुखी उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें ।

उत्तम गुणीं विवरावें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥

शाहाणे करावे जन । पतित करावे पावन ।

सृष्टिमधें भगवद्भकजन । वाढवावें ॥ ३३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

चातुर्येलक्षणनिरूपण समास सहावा ॥

20px