Samas 8
समास 8 - समास आठवा : अखंड ध्यान निरूपण
समास 8 - दशक १४
समास आठवा : अखंड ध्यान निरूपण॥ श्रीराम ॥
बरें ऐसा प्रसंग जाला । जाला तो होऊन गेला।
आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणे करावें ॥ १ ॥
देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।
मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ॥ २ ॥
आधीं देवासवोळखावें । मग अनन्यभावें भजावें ।
अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥
सर्वांमधें जो उत्तम । तया नाव सर्वोत्तम ।
आत्मानात्मविवेकवर्म । ठाईं पाडावें ॥ ४ ॥
जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी ।
पदार्थमात्रास परीक्षी । जाणपणें ॥ ५ ॥
तो सकळ देहामधें वर्ततो। इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।
प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्रीं ॥ ६ ॥
प्राणीमात्रीं जगदांतरें । म्हणोनि राखावीं अंतरें ।
दाता भोक्ता परस्परें । सकळ कांहीं ॥ ७ ॥
देव वर्ततो जगदांतरी । तोचि आपुलें अंतरीं ।
त्रैलोकींचे प्राणीमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥
मुळीं पाहाणार तो येकला । सकळां ठाईं विभागला ।
देहप्रकृतीनें जाला । भिन्न भिन्न ॥ ९ ॥
भिन्न भासें देहाकारें । प्रस्तुता येकचि अंतरें ।
बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥
आपुले पारिखे सकळ लोक । पक्षी स्वापद पश्वादिक ।
किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥
खेचर भूचर वनचर । नाना प्रकारें जळचर ।
चत्वार खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२॥
समस्त जाणीवेनें वर्तती । रोकडी पाहवी प्रचिती ।
त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३॥
जगदांतरें वोळला धणी । किती येकवटील प्राणी ।
परी ते वोळायाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥
हें आपणाकडेंच येतें । राजी राखिजे समस्तें ।
देहासि बरें करावें तें । आत्मयास पावे ॥ १५ ॥
दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव ।
रागास आला जरी राव । तरी तंडों नये कीं ॥ १६ ॥
प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें ।
विवेक सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥
आत्मत्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसमंध ।
येका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥
गरळ आणि अमृत जालें । परी आपपण नाहीं गेलें ।
साक्षत्वें आत्मयास पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥
अंतरिनिष्ठ जो पुरुष । तो अंतरनिष्ठेनें विशेष ।
जगामधें जो जगदीश । तो तयास वोळखे ॥ २० ॥
नयनेंचि पाहावा नयेन । मनें शोधावें मन ।
तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥
तेणेंविण कार्यभाग आडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे ।
प्राणी विवेकें पडावे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥
जागृतीस व्यापार घडतो । समंध तयासीच पडतो ।
स्वप्नामधें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥
अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।
याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥
सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।
आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥
परी तें धरितांहि धरेना । ध्यानीं येती वेक्ति ना ।
उगेंचि कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६ ॥
मूर्तिध्यान करिता। सायासें । तेथें येकाचें येकचि दिसे ।
भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥
ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्याचें करावें ।
हेंचि बरें विवरावें । आपले ठाईं ॥ २८ ॥
देह देउळ आत्मा देव । कोठें धरूं पाहातां भाव ।
देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥
अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें ।
प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेंचि मोडे ।
उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥
देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।
भोगणें त्यागणें विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥
ऐसें मनी आठवतें । विचारितां भलतेंचि होतें ।
दिसों नये तें दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥
दिसतें तें सांगतां न ये । बळें भावर्थ धरितां नये ।
साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥
सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।
मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥
फुटक मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें ।
तेथें कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥ ३६ ॥
अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित ।
हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥
ध्यान धरितें तें कोण । ध्यानीं आठवतें तें कोण ।
दोनीमधें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥
अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे ।
ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥
ऐसीं हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेंविण बाधिजे भ्रमें ।
लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥
दंडकध्यानाचें लक्षण । धरून बैसलें अवलक्षण ।
प्रमाण आअणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥
मिथ्या समाचार उठविती । बाउग्याच बोंबा घालिती ।
मनांस आणितां अंतीं । आवघेंचि मिथ्या ॥ ४२ ॥
कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणीयेक सिकवी त्याला ।
मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥
मनाचेथें काये दुष्काळ । जे आखुड कल्पिती माळ ।
सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥ ४४ ॥
प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती । दोरे फुलें गुंफावी न लगती ।
कल्पनेची माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥
बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ ।
तया मुर्खासीं खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥
जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला ।
साता पांचाचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥
प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून ।
तेथें अवघाची अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥
सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।
माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अखंडध्याननिरूपणनाम समास आठवा ॥