उपासना

Samas 9

समास ९ - समास नववा : शाश्वत निरूपण

समास ९ - दशक १४

समास नववा : शाश्वत निरूपण॥ श्रीराम ॥

पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक ।

पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥

आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली ।

आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥

आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी।

विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥

पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण ।

हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥

असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत ।

जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥

पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली ।

जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥

ते जळ तेजें शोषिलें । महत्तेजें आटोन गेलें ।

पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥

तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी ।

तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥

वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला ।

ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥

गुणमाया मूळमाया । परब्रह्मीं पावती लया ।

तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १० ॥

सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट ।

निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥

उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला ।

मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥

देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण ।

निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥

कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ ।

मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥

जें होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें ।

जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें वोळखावे ॥ १५ ॥

येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।

हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥

वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित ।

निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥

तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें

मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥

दृश्यास दिसते दृश्य । मनास भासतो भास ।

दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥

पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं ।

अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥

चंचळ तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापी चळेना ।

आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥

जें विकारें वाढें मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे ।

कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥

जे अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें ।

तयास हें कैसें उकले । आव्हाट चक्र ॥ २३ ॥

भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना ।

भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥

वैद्याची प्रचित येईना । आणी भीडहि उलंघेना ।

तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥

जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला ।

जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥

जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड ।

विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥

भीड मायेऐलिकडे । परब्रह्म तें पैलीकडे ।

पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥

लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें ।

ऐसी नव्हेंतीलक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥

खोटें आवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें ।

मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥

तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरूपण ।

सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

शाश्वतनिरूपणनाम समास नववा ॥

20px