Samas 8
समास 8 - समास आठवा : सूक्ष्मजीवनिरूपण
समास 8 - दशक १५
समास आठवा : सूक्ष्मजीवनिरूपण॥ श्रीराम ॥
रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपटचि थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥
ऐसे नाना जीव असती । पाहों जातां न दिसती ।
अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंचि आहे ॥ २ ॥
त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान ।
सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥
त्यास मुंगी माहा थोर । नेणोंचालिला कुंजर ।
मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥
तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें ।
समस्तांमध्यें जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥
ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥
नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढे ।
आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥
पक्षायेवढें लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं ।
सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडे ॥ ८ ॥
मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें ।
त्यांची निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग ।
येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥
येकें सुकुमारें येकें कठोरें। निर्माण केलीं जगदेश्वरें ।
सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥
शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें ।
अंतरीं वसिजे अभेदें । येकरूपें ॥ १२ ॥
येक त्रासकें येकमारकें। पाहो जातां नाना कौतुकें ।
कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥
ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
आपल्यापरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥
नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥
त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती ।
त्या विशाळ जीवांची स्थिती । कोणजाणे ॥ १६ ॥
जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव ।
पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे । ॥ १७ ॥
पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जिनस लाहानथोरें । कोण जाणें ॥ १८ ॥
येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावरी उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥
नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें ।
चौयासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥
उष्ण तेज वेगळे करुनी । जेथें तेथें जीवयोनी ।
कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥
येक नाना सामर्थ्यें केले । येक इच्छेपासून जाले ।
येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥
येक देह बाजीगिरीचे । येक देह वोडंबरीचे।
येक देह देवतांचे । नानाप्रकारें॥ २३॥
येक क्रोधापासून जाले । येक तपा पासून जन्मले ।
येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥
ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें ।
विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥
नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली ।
विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वें ॥ २६ ॥
थोडें बहुत समजलें। पोटापुरती विद्या सिकलें ।
प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७॥
ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा ।
त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८॥
सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥
आपल्य देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचें कळे ।
लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥
अनुरेणाऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष ।
आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥
त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक ।
जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥
धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं ।
उगीच अहंता पापिणी । वेढा लावी ॥ ३३ ॥
अहंता सांडून विवरणें । कित्येक देवांचे करणें ।
पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५॥
कुश्चीळ ठाईं जन्मलें । आणि कुश्चीळ रसेंचि वाढलें।
यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥३६॥
कुश्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर ।
लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥
कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी ची ची ।
झांकातापा करून उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८॥
झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे ।
जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥
उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें ।
विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मजीवनिरूपणनाम समास आठवा ॥