उपासना

Samas 1

समास 1 - समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण

समास 1 - दशक १६

समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण॥ श्रीराम ॥

धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक ।

जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥

भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं ।

धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥

भविष्याचें येक वचन । कदाचित जालें प्रमाण ।

तरी आश्चिर्य मानिती जन । भूमंडळीचे ॥ ३ ॥

नसतां रघुनाथावतार । नाहीं पाहिला शास्त्राधार ।

रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥

ऐसा जयाचा वाग्विळास । ऐकोनी संतोषला महेश ।

मग विभागिलें त्रयलोक्यास । शतकोटी रामायेण ॥ ५ ॥

ज्याचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें ।

रामौपासकांसी जालें । परम समाधान ॥ ६ ॥

ऋषी होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार ।

परी वाल्मीकासारिखा कवेश्वर । न भूतो न भविष्यति ॥ ७ ॥

पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें ।

नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥

उफराटे नाम म्हणतां वाचें । पर्वत फुटले पापाचे ।

ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥ ९ ॥

वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें ।

शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जयाच्या ॥ १० ॥

पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं ।

तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्वरीं ॥ ११ ॥

उपरती आणि अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप ।

देह्यांततपें पुण्यरूप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥

अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें ।

तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥

वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे ।

जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचें ॥ १४ ॥

जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवेश्वरांमधें वरिष्ठ ।

जयाचें बोलणें पष्ट । निश्चयाचें ॥ १५ ॥

जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तांचें भूषण ।

ज्याची धारणा असाधारण । साधकां सदृढ करी ॥ १६ ॥

धन्य वाल्मीक ऋषेश्वर । समर्थाचा कवेश्वर ।

तयासी माझा नमस्कार । साष्टांगभावें ॥ १७ ॥

वाल्मीक ऋषी बोलिला नसता । तरी आम्हांसी कैंची रामकथा ।

म्हणोनियां समर्था । काय म्हणोनी वर्णावें ॥ १८ ॥

रघुनथकीर्ति प्रगट केली । तेणें तयची महिमा वाढली ।

भक्त मंडळी सुखी जाली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥

आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमधें बुडाला ।

भूमंडळीं उधरिला । बहुत लोक ॥ २० ॥

रघुनाथ भक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार ।

त्या समस्तांचा किंकर । रामदास म्हणे ॥ २१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

वाल्मीकस्तवननिरूपणनाम समास पहिला ॥

20px