उपासना

Samas 10

समास 10 - समास दहावा : गुणभूतनिरूपण

समास 10 - दशक १६

समास दहावा : गुणभूतनिरूपण॥ श्रीराम ॥

पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलियां मग । काये आहे ॥ १ ॥

श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमे वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥

अंतरात्मा पांचवे भूत । त्रिगुण त्याचें अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहें ॥ ३ ॥

भूत म्हणिजे जितुकें जालें । त्रिगुण जाल्यांत आले । इतुकेन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥

भूतांवेगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्व हि । येकावेगळें येक कांहीं । घडेचिना ॥ ५ ॥

आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥

जीवन आवघें डबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हीवायोचेन जालें । भूमंडळ ॥ ७ ॥

वन्ही वायो रवी नस्तां । तरी होते उदंड सीतळता । ते सीतळतेमधें उष्णता । येणें न्यायें ॥ ८ ॥

आवघें वर्मासी वर्म केलें । तरीच येवढें फांपावलें । देहेमात्र तितुकें जालें । वर्माकरितां ॥ ९ ॥

आवघें सीतळचि असतें । तरी प्राणीमात्र मरोनी जातें । आवघ्या उष्णेंचि करपते । सकळ कांहीं ॥ १० ॥

भूमंडळ आळोन गोठलें । तें रविकिर्णें वाळोन गेलें । मग सहज चि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥

म्हणोनी केला प्रज्यन्यकाळ । थंड जालें भूमंडळ । पुढेंउष्ण कांहीं सीतळ । सीतकाळ जाणावा ॥ १२ ॥

सीतकाळें कष्टले लोक । कर्पोन गेलें वृक्षादिक । म्हणोन पुढें कौतुक । उष्णकाळाचें ॥ १३ ॥

त्याहिमधें प्रातःकाळ । माध्यानकाळ सायंकाळ । सीतकाळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥

ऐसें येकामागें येक केलें । विलेनें नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणीमात्र ॥ १५ ॥

नाना रसें रोग कठिण । म्हणोनी औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टीचें विवरण । कळलें पाहिजे ॥ १६॥

देहेमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दात । ऐसीच भूमंडळीं प्रचित । नाना रत्नांची ॥ १७ ॥

सकळांसी मूळ जीवन बांधा । जीवनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरिगोविंदा । प्राणी कैचे ॥ १८ ॥

जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिके इंद्रनीळ । ते जळें जाले ॥ १९ ॥

महिमा कोणाचा सांगावा । जाला कर्दमुचि आघवा । वेगळवेगळु निवडावा । कोण्या प्रकारें ॥ २० ॥

परंतु बोलिलें कांहींयेक । मनास कळावया विवेक । जनामधें तार्किक लोक । समजती आघवें ॥ २१ ॥

आवघें समजलें हें घडेना । शास्त्रांशास्त्रांसीं पडेना । अनुमानें निश्चय होयेना । कांहींयेक ॥ २२ ॥

अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णूं न शके वाचें । वेदविधी तेहि काचे । देवेंविण ॥ २३ ॥

आत्माराम सकळां पाळी । आवघें त्रयलोक्य सांभाळी । तया येकेंविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥

जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रयलोकीचे प्राणी सर्व हि । प्रेतरूपी ॥ २५ ॥

आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचें जिणें । बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥

समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैचें । कोणीयेकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥

उपासना प्रगट जाली । तरी हे विचारणा कळली । याकारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥

उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो । उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥

समर्थाची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी । याकारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥

भजन साधन अभ्यास। येणें पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुणभूतनिरूपणनाम समास दहावा ॥

20px