उपासना

Samas 2

समास 2 - समास दुसरा : सूर्यस्तवननिरूपण

समास 2 - दशक १६

समास दुसरा : सूर्यस्तवननिरूपण

॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा सूर्यवौंश । सकळ वौंशामधें विशेष ।

मार्तंडमंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥

सोमाआंगीं आहे लांछन । पक्षा येका होय क्षीण ।

रविकिर्ण फांकता आपण । कळाहीन होये ॥ २ ॥

याकारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे ।

जयाच्या प्रकाशें उजेडे । प्राणीमात्रासी ॥ ३ ॥

नाना धर्म नाना कर्में । उत्तमें मध्यमें अधमें ।

सुगमें दुर्गमें नित्य नेमें । सृष्टीमधें चालती ॥ ४ ॥

वेदशास्त्रें आणी पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें ।

संध्या स्नान पूजाविधानें । सूर्येंविण बापुडीं ॥ ५ ॥

नाना योग ना मतें । पाहों जातां असंख्यातें ।

जाती आपुलाल्या पंथें । सूर्यौदय जालियां ॥ ६ ॥

प्रपंचिक अथवा परमार्थिक । कार्य करणें कोणीयेक ।

दिवसेंविण निरार्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥

सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे ।

याकारणें कांहींच न चले । सूर्येंविण ॥ ८ ॥

म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेहि सुर्याचीच गती ।

थंड जालियां आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥

उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा ।

उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ १० ॥

याकारणें सूर्येंविण । सहसा न चले कारण ।

श्रोते तुम्ही विचक्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥

हरिहरांच्या अवतरमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत वेक्ती ।

यापूर्वीं होता गभस्ती । आतां हि आहे ॥ १२ ॥

जितुके संसारासि आले । तितुके सूर्याखालें वर्तले ।

अंती देहे त्यागून गेले । प्रभाकरादेखतां ॥ १३ ॥

चंद्र ऐलीकडे जाला । क्षीरसागरीं मधून काढिला ।

चौदा रत्नांमधें आला । बंधु लक्षुमीचा ॥ १४ ॥

विश्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लाहानथोर ।

याकारणें दिवाकर । श्रेष्ठांहून श्रेष्ठ ॥ १५ ॥

अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंचि प्रत्यहीं येणें जाणें ।

या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥

दिवस नस्तां अंधकार । सर्वांसी नकळे सारासार ।

दिवसेंविण तश्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥

सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें सामोरें ।

तेजोरासी निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥

ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।

अगाध महिमा मानवी वाचा । काये म्हणोनि वर्णावी ॥ १९ ॥

रघुनाथवौंश पूर्वापर । येकाहूनि येक थोर ।

मज मतिमंदास हा विचार । काये कळे ॥ २० ॥

रघुनाथाचा समुदाव । तेथें गुंतला अंतर्भाव ।

म्हणोनी वर्णितां महत्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥

सकळ दोषाचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार ।

स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सूर्यस्तवननिरूपणनाम समास दुसरा ॥

20px