उपासना

Samas 3

समास 3 - समास तिसरा : पृथ्वीस्तवननिरूपण

समास 3 - दशक १६

समास तिसरा : पृथ्वीस्तवननिरूपण॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हे वसुमती । इचा महिमा सांगों किती ।

प्राणीमात्र तितुके राहाती । तिच्या आधारें ॥ १ ॥

अंतरिक्ष राहाती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव ।

देहे जड नस्तां जीव । कैसे तगती ॥ २ ॥

जाळिती पोळिती कुदळिती । नांगरिती उकरिती खाणती ।

मळ मूत्र तिजवरी करिती । आणी वमन ॥ ३ ॥

नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंची थार ।

देह्यांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥

बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं ।

नाना धातु द्रव्य तें हि । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥

येकास येक संव्हारिती । प्राणी भूमीवरी असती ।

भूमी सांडून जाती । कोणीकडे ॥ ६ ॥

गड कोठ पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें ।

देव दानव मानव राहाणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥

नाना रत्नें हिरे परीस । नाना धातु द्रव्यांश ।

गुप्त प्रगट कराव्यास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥

मेरुमांदार हिमाचळ । नाना अष्टकुळाचळ ।

नाना पक्षी मछ व्याळ । भूमंडळीं ॥ ९ ॥

नाना समुद्रापैलीकडे । भोंवतें आवर्णोदका कडें ।

असंभाव्य तुटले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥

त्यामधें गुप्त विवरें । लाहानथोरें अपारें ।

तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥

आवर्णोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार ।

उदंड दाटले जळचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥

त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणी घन ।

फुटों शकेना जीवन । कोणेकडे ॥ १३ ॥

त्या प्रभंजनासी आधार । कठिणपणें अहंकार ।

ऐसा त्या भूगोळाचा पार । कोण जाणे ॥ १४॥

नाना पदार्थांच्या खाणी । धातुरत्नांच्या दाटणी ।

कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥

नाना दीपें नाना खंडें । वसती उद्वसें उदंडें ।

तेथें नाना जीवनाचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥

मेरुभोंवते कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें ।

निबिड तरु लागले । नाना जिनसी ॥ १७ ॥

त्यासन्निध लोकालोक । जेथें सूर्याचें फिरे चाक ।

चंद्रादि द्रोणाद्रि मैनाक । माहां गिरी ॥ १८ ॥

नाना देशीं पाषाणभेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद ।

नाना विभूति छंद बंद । नाना खाणी ॥ १९ ॥

बहुरत्न हे वसुंदरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा ।

अफट पडिलें सैरावैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥

अवघी पृथ्वी फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।

दुजी तुळणा न साहे । धरणीविषीं ॥२१ ॥

नाना वल्ली नाना पिकें । देसोदेसी अनेकें ।

पाहों जातां सारिख्या सारिखें । येक हि नाहीं ॥ २२ ॥

स्वर्ग मृत्यु आणिपाताळें । अपूर्व रचिलीं तीन ताळें।

पाताळलोकीं माहां व्याळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥

नान वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाळ धरणी ।

अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥

गड कोठ नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें ।

सकळां ठाईं जगदेश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥

माहां बळी होऊन गेले । पृथ्वीवरी चौताळले ।

सामर्थ्यें निराळे राहिले । हें तों घडेना ॥ २६ ॥

असंभाव्य हे जगती। जीव कितीयेक जाती ।

नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥

सध्यां रोकडे प्रमाण । कांहीं करावा नलगे अनुमान ।

नाना प्रकारीचें जीवन । पृथ्वीचेनि आधारें ॥ २८ ॥

कित्तेक भूमी माझी म्हणती । सेवटीं आपणचि मरोन जाती ।

कित्तेक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥

ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काये द्यावी उपमा ।

ब्रह्मादिकापासुनी आम्हां । आश्रयोचि आहे ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

पृथ्वीस्तवननिरूपणनाम समास तिसरा ॥

20px