उपासना

Samas 5

समास 5 - समास पाचवा : अग्निनिरूपण

समास 5 - दशक १६

समास पाचवा : अग्निनिरूपण॥ श्रीराम ॥

धन्य धन्य हा वैश्वानरु । होये रघुनाथाचा श्वशुरु ।

विश्वव्यापक विश्वंभरु । पिता जानकीचा ॥ १ ॥

ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषीचा फळदाता ।

तमहिमरोगहर्ता । भर्ता विश्वजनाचा ॥ २ ॥

नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रास अभेद ।

अभेद आणी परम शुध । ब्रम्हादिकासी ॥ ३ ॥

अग्नीकरितां सृष्टी चाले । अग्नीकरितां लोक धाले ।

अग्नीकरितां सकळ ज्याले । लाहानथोर ॥ ४ ॥

अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहव्या जालें स्थळ ।

दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥ ५ ॥

पोटामधें जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं ।

अग्नीकरितां भोजनीं । रुची येते ॥ ६ ॥

अग्नी सर्वांगीं व्यापक । उष्णें राहे कूणी येक ।

उष्ण नस्तां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥

आधीं अग्नी मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो ।

ऐसा हा अनुभव येतो । प्राणीमात्रासी ॥ ८ ॥

असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ ।

अग्नी आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥

नाना रस निर्माण जाले । अग्नीकरितां निपजले ।

माहांरोगी आरोग्य जाले । निमिषमात्रें ॥ १० ॥

सूर्य सकळांहून विशेष । सूर्याउपरी अग्नीप्रवेश ।

रात्रभागीं लोक अग्नीस । साहें करिती ॥ ११ ॥

अंत्यजगृहींचा अग्नी आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला ।

सकळां गृहीं पवित्र जाला । वैश्वानरु ॥ १२ ॥

अग्नीहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग ।

अग्नी त्रुप्त होतां मग । सुप्रसन्न होतो ॥ १३ ॥

देव दानव मानव । अग्नीकरितां चाले सर्व ।

सकळ जनासी उपाव । अग्नी आहे ॥ १४ ॥

लग्नें करिती थोर थोर । नाना दारूचा प्रकार ।

भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥

नाना लोक रोगी होती । उष्ण औशधें सेविती ।

तेणे लोक आरोग्य होती । वन्हीकरितां ॥ १६ ॥

ब्रह्मणास तनुमनु । सूर्यदेव हुताशनु ।

येतद्विषईं अनुमानु । कांहींच नाहीं ॥ १७ ॥

लोकामध्यें जठरानळु । सागरीं आहे वडवनाळु ।

भूगोळाबाहेर आवर्णानळु । शिवनेत्रीं विदुल्यता ॥ १८ ॥

कुपीपासून अग्नी होतो । उंचदर्पणीं अग्नी निघतो ।

काष्ठमंथनी प्रगटतो । चकमकेनें ॥ १९ ॥

अग्नी सकळां ठाईं आहे । कठीण घिसणीं प्रगट होये ।

आग्यासर्पें दग्ध होये । गिरिकंदरें ॥ २० ॥

अग्नीकरितां नाना उपाये । अग्नीकरितां नाना अपाय ।

विवेकेंविण सकल होये । निरार्थक ॥ २१ ॥

भूमंडळीं लाहानथोर । सकळांस वन्हीचा आधार ।

अग्निमुखें परमेश्वर । संतुष्ट होये ॥ २२ ॥

ऐसा अग्नीचा महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।

उत्तरोत्तर अगाध महिमा । अग्नीपुरुषाचा ॥ २३ ॥

जीत असतां सुखी करी । मेल्यां प्रेत भस्म करी ।

सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ॥ २४ ॥

सकळ सृष्टीचा संव्हार । प्रळय करी वैश्वानर ।

वैश्वानरें पदार्थमात्र । कांहींच उरेना ॥ २५ ॥

नाना होम उदंड करिती । घरोघरीं वैशदेव चालती ।

नाना क्षेत्रीं दीप जळती । देवापासीं ॥ २६ ॥

दीपाराधनें निलांजनें । देव वोवाळिजे जनें ।

खरें खोटें निवडणें । दिव्य होतां ॥ २७ ॥

अष्टधा प्रकुर्ती लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही ।

अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ॥ २८ ॥

च्यारी श्रृंगें त्रिपदीं जात । दोनी शिरें सप्त हात ।

ऐसा बोलिला शास्त्रार्थ । प्रचितीविण ॥ २९ ॥

ऐसा वन्ही उष्णमूर्ती । तो मी बोलिलों येथामती ।

न्यून्यपूर्ण क्षमा श्रोतीं । केलें पाहिजे ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

अग्निनिरूपणनाम समास पांचवा ॥

20px