Samas 6
समास 6 - समास सहावा : वायुस्तवन
समास 6 - दशक १६
समास सहावा : वायुस्तवन॥ श्रीराम ॥
धन्य धन्य हा वायुदेव । याचा विचित्र स्वभाव ।
वायोकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥
वायोकरितां श्वासोश्वास । नाना विद्यांचा अभ्यास ।
वायोकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥
चळण वळण प्रासारण । निरोधन आणी आकोचन ।
प्राण अपान व्यान उदान । समान वायु ॥ ३ ॥
नाग कूर्म कर्कश वायो । देवदत्त धनंजयो।
ऐसे हे वायोचे स्वभावो । उदंड असती ॥ ४ ॥
वायो ब्रह्मांडीं प्रगटला । ब्रह्मांडदेवतांस पुरवला ।
तेथुनी पिंडी प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥
स्वर्गलोकीं सकळ देव । तैसेचि पुरुषार्थी दानव ।
मृत्यलोकींचे मानव । विख्यात राजे ॥ ६ ॥
नरदेहीं नाना भेदे । अनंत भेदाचीं श्वापदें ।
वनचरें जळचरें आनंदें । क्रीडा करिती॥ ७॥
त्या समस्तांमधें वायु खेळे । खेचरकुळ अवघें चळे ।
उठती वन्हीचे उबाळे । वायोकरितां ॥ ८॥
वायो मेघाचें भरण भरी। सवेंच पिटून परतें सारी ।
वायो ऐसा कारबरी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥
परी ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वता ।
परी व्यापकपणें या समर्था । तुळणा नाहीं ॥ १० ॥
गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले लोककाजा ।
गर्जगर्जों तडक विजा । वायोबळें ॥ ११ ॥
चंद्रसूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा ।
यें ब्रह्मांडीं नाना कळा । वायोकरितां ॥ १२ ॥
येकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होयेना ।
तैसें हे बेंचाड नाना । केवी कळे ॥ १३ ॥
वायो सुटे सरारां । असंभाव्य पडतीगारा ।
तैसे जीव हे नीरा- । सरिसे पडती ॥ १४ ॥
वायुरूपें कमळकळा । तोचि आधार जळा ।
तया जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥१५ ॥
शेषास पवनाचा आहार । आहारें फुगे शरीर ।
तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥१६॥
माहांकूर्माचें शरीर भलें । नेणों ब्रह्मांड पालथें घातलें ।
येवढें शरीर तें राहिलें । वायोचेनी ॥ १७॥
वाराहें आपुलें दंतीं । पृथ्वी धरिली होती ।
तयाची येवढी शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥
ब्रह्म विष्णु महेश्वर । चौथा आपण जगदेश्वर ।
वायोस्वरूप विचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥
तेतिस कोटी सुरवर । अठ्यासी सहस्र ऋषेश्वर ।
सिध योगी भारेंभार । वायोकरितां ॥ २० ॥
नव कोटी कात्यायणी । छेपन कोटी च्यामुंडिणी ।
औट कोटी भूतखाणी । वायोरूपें ॥ २१॥
भूतें देवतें नाना शक्ती । वायोरूप त्यांच्या वेक्ती ।
नाना जीव नेणो किती । भूमंडळीं ॥ २२ ॥
पिंडीं ब्रह्मांडीं पुरवला । बाहेर कंचुकास गेला ।
सकळां ठाईं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥
ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन ।
रघुनाथस्मरणीं तनमन । हनुमंताचें ॥ २४ ॥
हनुमंत वायोचा प्रसीध । पित्यापुत्रांस नाहीं भेद ।
म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषीं ॥ २५ ॥
हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ ।
प्राणेंविण सकळ वेर्थ । होत जातें ॥ २६ ॥
मागें मृत्य आला हनुमंता । तेव्हां वायो रोधला होता ।
सकळ देवांस आवस्ता । प्राणांत मांडलें ॥ २७ ॥
देव सकळ मिळोन । केलें वायुचें स्तवन ।
वायो प्रसन्न होऊन । मोकळें केलें ॥ २८ ॥
म्हणोनि प्रतपी थोर । हनुमंत ईश्वरी अवतार ।
यचा पुरुषार्थ सुरवर । पाहातचि राहिले ॥ २९ ॥
देव कारागृहीं होते । हनुमंतें देखिलें अवचितें ।
संव्हार करूनी लंकेभोंवतें । विटंबून पाडिलें ॥ ३० ॥
उसिणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें ।
मोठें कौतुक पुछ्यकेताचें । आश्चर्य वाटे ॥ ३१ ॥
रावण होता सिंह्यासनावरी । तेथें जाऊन ठोंसरे मारी ।
लंकेमधें निरोध करी । उदक कैचें ॥ ३२ ॥
देवास आधार वाटला । मोठा पुरुषार्थ देखिला ।
मनामधें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥
दैत्य आवघे संव्हारिले । देव तत्काळ सोडिले ।
प्राणीमात्र सुखी जाले । त्रयलोक्यवासी ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वायोस्तवननिरूपणनाम समास सहावा ॥