उपासना

Samas 7

समास 7 - समास सातवा : महद्‍भूतनिरूपण

समास 7 - दशक १६

समास सातवा : महद्‍भूतनिरूपण॥ श्रीराम ॥

पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अग्न ।

अग्नीचें मूळ पवन । मागां निरोपिलें ॥ १ ॥

आतां ऐका पवनाचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।

अत्यंतचि चंचळ । सकळांमधें ॥ २ ॥

तो येतो जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना ।

ज्याचें रूप अनुमानेना । वेदश्रुतीसी ॥ ३ ॥

मुळीं मुळींचें स्फुर्ण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण ।

जगदेश्वरापासून त्रिगुण । पुढें जालें ॥ ४ ॥

त्रिगुणापासून जालीं भूतें। पावलीं पष्ट दशेतें ।

त्या भूतांचें स्वरूप तें । विवेकें वोळखावें ॥ ५ ॥

त्यामधें मुख्य आकाश । चौ भूतांमधें विशेष ।

याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ कांहीं ॥ ६ ॥

येक विष्णु महद्‍भूत । ऐसा भूतांचा संकेत ।

परंतु याची प्रचीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥

विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतामधें व्यापक तें ।

विवरोन पाहातां येतें । प्रत्ययासी ॥ ८ ॥

आत्मयाच्या चपळपणापुढें । वायो तें किती बापुडें ।

आत्म्याचें चपळपण रोकडें । समजोन पाहावें ॥ ९ ॥

आत्म्यावेगळें काम चालेना । आत्मा दिसेना ना आडळेना ।

गुप्तरूपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥

पिंड ब्रह्मांड व्यापून धरिलें । नाना शरीरीं विळासलें ।

विवेकी जनासी भासलें । जगदांतरी ॥ ११ ॥

आत्म्याविण देहे चालती । हें तों न घडे कल्पांतीं ।

अष्टधा प्रकृर्तीच्या वेक्ती । रूपासी आल्या ॥ १२ ॥

मूळापासून सेवटवरी । सकळ कांहीं आत्माच करी ।

आत्म्यापैलीकडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥

आत्मा शरीरीं वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।

नाना सुखदुःखें भोगितो । देह्यात्मयोगें ॥ १४ ॥

सप्तकंचुक हें ब्रह्मांड । त्यामधें सप्तकंचुक पिंड ।

त्या पिंडामधें आत्मा जाड । विवेकें वोळखा ॥ १५ ॥

शब्द ऐकोन समजतो । समजोन प्रत्योत्तर देतो ।

कठीण मृद सीतोष्ण जाणतो । त्वचेमधें ॥ १६ ॥

नेत्रीं भरोनी पदार्थ पाहाणें । नाना पदार्थ परीक्षणें ।

उंच नीच समजणें । मनामधें ॥ १७॥

क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी ।

नाना प्रकारींच्या दृष्टी । भेद जाणे॥ १८ ॥

जिव्हेमधें नाना स्वाद । निवडून जाणे भेदाभेद ।

जें जें जाणें तें तें विशद । करुनी बोले ॥ १९॥

उत्तम अन्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ ।

नाना फळांचे परिमळ । घ्राणैंद्रियें जाणे ॥ २० ॥

जिव्हेनें स्वाद घेणें बोलणें । पाणीईइंद्रियें घेणें देणें ।

पादैंद्रियें येणें जाणें । सर्वकाळ ॥२१ ॥

शिस्नैंद्रियें सुरतभोग । गुदैंद्रियें मळोत्सर्ग ।

मनेंकरूनी सकळ सांग । कल्पून पाहे ॥ २२॥

ऐसें व्यापार परोपरी । त्रिभुवनीं येकलाचि करी ।

त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥

त्याविण दुसरा कैचा । जे महिमा सांगावा तयाचा ।

व्याप आटोप आत्मयाचा । न भूतो न भविष्यति ॥ २४ ॥

चौदा विद्या चौसष्टी कळा । धूर्तपणाच्या नाना कळा ।

वेद शास्त्र पुराण जिव्हाळा । तेणेंविण कैचा ॥ २५ ॥

येहलोकींचा आचार । परलोकीं सारासारविचार ।

उभय लोकींचा निर्धार । आत्माच करी ॥ २६ ॥

नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेवाद ।

नाना निश्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥

मुख्यतत्व विस्तारलें । तेणें तयास रूप आणिलें ।

येणेंकरितां सार्थक जालें । सकळ कांहीं ॥ २८ ॥

लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें ।

गाणें बाजवणें नाचणें । आत्म्याचकरितां ॥ २९ ॥

नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें कष्टी होतो ।

देहे धरितो आणी सोडितो । नानाप्रकारें ॥ ३० ॥

येकलाचि नाना देहे धरी । येकलाचि नटे परोपरी ।

नट नाट्यकळा कुसरी । त्याविण नाहीं ॥ ३१ ॥

येकलाचि जाला बहुरूपी । बहुरूपी बहुसाक्षपी ।

बहुरूपें बहुप्रतापी । आणी लंडी ॥ ३२ ॥

येकलाचि विस्तारला कैसा । पाहे बहुविध तमासा ।

दंपत्येंविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥

स्त्रियांस पाहिजे पुरुष । पुरुषासी पाहिजे स्त्रीवेष ।

ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥

स्थूळाचें मूळ तें लिंग । लिंगामधें हें प्रसंग ।

येणें प्रकारें जग । प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥

पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी । ऐसी होते उठाठेवी ।

परी या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥

स्थूळांकरितां वाटे भेद । सूक्षमीं आवघेंचि अभेद ।

ऐसें बोलणें निरुध । प्रत्यया आलें ॥ ३७ ॥

बायकोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें ।

बायकोस अंतरी लागलें । ध्यान पुरुषाचें ॥३८ ॥

स्त्रीसी पुरुष पुरुषास वधु । ऐसा आहे हा समंधु ।

याकारणें सूक्ष्म संवादु । सुक्ष्मीं च आहे ॥ ३९ ॥

पुरुषैछेमधें प्रकृती । प्रकृतीमधें पुरुषवेक्ती ।

प्रकृतीपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥

पिंडावरून ब्रह्मांड पाहावें । प्रचीतीनें प्रचीतीस घ्यावें ।

उमजेना तरी उमजावें । विवराविवरों ॥ ४१ ॥

द्वैतैछा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं ।

भूमंडळीं आणी मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥

येथें मोठा जाला साक्षेप । फिटला श्रोतयांचा आक्षेप ।

जे प्रकृतीपुरुषाचें रूप । निवडोन गेलें ॥ ४३ ॥

20px