उपासना

Samas 8

समास 8 - समास आठवा : आत्मारामनिरूपण

समास 8 - दशक १६

समास आठवा : आत्मारामनिरूपण॥ श्रीराम ॥

नमूं गणपती मंगळमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती ।

लोक भजनी स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥

नमूं वैखरी वागेश्वरी । अभ्यांतरीं प्रकाश करी ।

नाना भरोवरी विवरी । नाना विद्या ॥ २ ॥

सकळ जनांमधें नाम । रामनाम उत्तमोत्तम ।

श्रम जाउनी विश्राम । चंद्रमौळी पावला ॥ ३ ॥

नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर ।

परात्पर परमेश्वर । त्रयलोक्यधर्ता ॥ ४ ॥

आत्माराम चहुंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे ।

देहे पडे मृत्य घडे । आत्मयाविण ॥ ५ ॥

जीवात्मा शिवात्मा परमात्मा । जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा ।

आत्मा अंतरत्मा सूक्ष्मात्मा । देवदानवमानवीं ॥ ६ ॥

सकळ मार्ग चालती बोलती । अवतारपंगतीची गती ।

आत्म्याकरितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥

नादरूप जोतीरूप । साक्षरूप सत्तारूप ।

चैतन्यरूप सस्वरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥

नरोत्तमु विरोत्तमु । पुरुषोत्तमु रघोत्तमु ।

सर्वोत्तमु उत्तमोत्तमु । त्रयलोक्यवासी ॥ ९ ॥

नाना खतपट आणी चटपट । नाना लटपट आणि झटपट ।

आत्मा नसतां सर्व सपाट । चहुंकडे ॥ १० ॥

आत्म्याविण वेडें कुडें । अत्म्याविण मडें बापुडें ।

आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥

आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनी आत्मयालागुनी ।

भुवनी अथवा त्रिभुवनीं । अत्म्याविणें वोस ॥ १२ ॥

परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार ।

आत्म्याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥

सर्वांगीं सिध सावध । नाना भेद नाना वेध ।

नाना खेद आणी आनंद । तेणेंचिकरितां ॥ १४ ॥

रंक अथवा ब्रह्मादिक । येकचि चालवी अनेक ।

पाहावा नित्यानित्यविवेक । कोण्हियेकें ॥ १५ ॥

ज्याचे घरी पद्मिणी नारी । आत्मा तंवरी आवडी धरी ।

आत्मा गेलियां शरीरीं । तेज कैचें ॥ १६ ॥

आत्मा दिसेना ना भासेना । बाह्याकारें अनुमानेना ।

नाना मनाच्या कल्पना । आत्मयाचेनी ॥ १७ ॥

आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भरी ।

वासना भावना परोपरीं । किती म्हणोनी सांगाव्या ॥ १८ ॥

मनाच्या अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती ।

अनंत प्राणी सांगो किती । अंतर त्यांचें ॥ १९ ॥

अनंत राजकारणें धरणें । कुबुधी सुबुधी विवरणें ।

कळों नेदणें चुकावणें । प्राणीमात्रासी ॥ २० ॥

येकास येक जपती टपती । येकास येक खपती लपती ।

शत्रुपणाची स्थिती गती । चहुंकडे ॥ २१ ॥

पृथ्वीमधें परोपरीं । येकास येक सिंतरी ।

कित्तेक भक्त परोपरीं । परोपकार करिती ॥ २२ ॥

येक आत्मा अनंत भेद । देहेपरत्वें घेती स्वाद ।

आत्मा ठाईंचा अभेद । भेद हि धरी ॥ २३ ॥

पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष पाहिजे ।

नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥

पुरुषाचा जीव स्त्रीयांची जीवी । ऐसी नाहीं उठाठेवी ।

विषयसुखाची गोवी । तेथें भेद आहे ॥ २५ ॥

ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर ।

पशूचे आहारीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥

आहारभेद देहेभेद । गुप्त प्रगट उदंड भेद ।

तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥

सिंधु भूगर्भींचीं नीरें । त्या नीरामधील शरीरें ।

आवर्णोदकाचीं जळचरें । अत्यंत मोठी ॥ २८ ॥

सूक्ष्म दृष्टीं आणितां मना । शरीराचा अंत लागेना ।

मा तो अंतरात्मा अनुमाना । कैसा येतो ॥ २९ ॥

देह्यात्मयोग शोधून पाहिला । तेणें कांहीं अनुमानला ।

स्थूळसूक्ष्माचा गलबला । गथागोवी ॥ ३० ॥

गथागोवी उगवाव्याकारणें । केलीं नाना निरूपणें ।

अंतरात्मा कृपाळुपणें । बहुतां मुखें बोलिला ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

आत्मारामनिरूपणनाम समास आठवा ॥

20px