Samas 9
समास ९ - समास नववा : नाना उपासनानिरूपण
समास ९ - दशक १६
समास नववा : नाना उपासनानिरूपण॥ श्रीराम ॥
पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना । भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥
अपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती । जे जे निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥
याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव । अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥
निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण । सकळ त्याचे अंश हें प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥
सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥
श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥
वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥
थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें । याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें । हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥
सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे । साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥
मागील आशंकेचें निर्शन । होतां जालें समाधान । आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥
चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥
वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥
विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥
कल्पांतप्रळईं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥
सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर । शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥
काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥
नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥
वृष्टी होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥
खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारींचीं शरीरें । नान रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥
कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें । उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥
पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहनथोरें । बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥
दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार । विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥
विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण । प्रचित आणी अनुमान । येणें रितीं ॥ २५ ॥
न्याय आणी अन्याय । होय आणी न होये । विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥
कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी । धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥
धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥
वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ । सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाना उपासनानिरूपणनाम समास नववा ॥