Samas 8
समास 8 - समास आठवा : तत्त्वनिरसन
समास 8 - दशक १७
समास आठवा : तत्त्वनिरसन॥ श्रीराम ॥
नाभीपासून उन्मेषवृत्ती । तेचि परा जाणिजे श्रोतीं ।
ध्वनिरूप पश्यंती । हृदईं वसे ॥ १ ॥
कंठापासून नाद जाला । मध्यमा वाचा बोलिजे त्याला ।
उच्चर होतां अक्षराला । वैखरी बोलिजे ॥ २ ॥
नाभिस्थानीं परा वाचा । तोचि ठाव अंतःकर्णाचा ।
अंतःकर्णपंचकाचा । निवाडा ऐसा ॥ ३ ॥
निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।
तें जाणावें अंतःकर्ण । जाणतीकळा ॥ ४ ॥
अंतःकर्ण आठवलें । पुढें होये नव्हेसें गमलें ।
करूं न करू ऐसें वाटलें । तेंचि मन ॥ ५ ॥
संकल्प विकल्प तेंचि मन । जेणें करितां अनुमान ।
पुढें निश्चयो तो जाण । रूप बुद्धीचें ॥ ६ ॥
करीनचि अथवा न करी । ऐसा निश्चयोचि करी ।
तेचि बुद्धि हे अंतरीं । विवेकें जाणावी ॥ ७ ॥
जे वस्तुचा निश्चये केला । पुढें तेचि चिंतूं लागला ।
तें चित्त बोलिल्या बोला । येथार्थ मानावें ॥ ८ ॥
पुढें कार्याचा अभिमान धरणें । हें कार्ये तों अगत्य करणें ।
ऐस्या कार्यास प्रवर्तणें । तोचि अहंकारु ॥ ९ ॥
ऐसें अंतःकर्णपंचक । पंच वृत्ती मिळोन येक ।
कार्येभागें प्रकारपंचक । वेगळाले ॥ १० ॥
जैक्षे पांचहि प्राण । कार्येभागें वेगळाले जाण ।
नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ॥ ११ ॥
सर्वांगीं व्यान नाभी समान । कंठी उदान गुदीं अपान ।
मुखीं नासिकीं प्राण । नेमस्त जाणावा ॥ १२ ॥
बोलिलें हें प्राणपंचक । आतां ज्ञानैंद्रियेंपंचक ।
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक । ऐसीं हें ज्ञानेंद्रियें ॥ १३ ॥
वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे कर्मैंद्रियें प्रसिद्ध ।
शब्द स्परुष रूप रस गंध । ऐसें हें विषयपंचक ॥ १४ ॥
अंतःकर्ण प्राणपंचक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रिये पंचक ।
पांचवें विषयपंचक । ऐसीं हे पांच पंचकें ॥ १५ ॥
ऐसें हे पंचविस गुण । मिळोन सूक्ष्म देह जाण ।
याच कर्दम बोलिला श्रवण । केलें पाहिजे ॥ १६ ॥
अंतःकर्ण व्यान श्रवण वाचा । शब्द विषये आकाशाचा ।
पुढें विस्तार वायोचा । बोलिला असे ॥ १७ ॥
मन समान त्वचा पाणी । स्पर्श रूप हा पवनीं ।
ऐसे हे अडाखे साधुनी । कोठा करावा ॥ १८ ॥
बुद्धि उदान नयेन चरण । रूपविषयाचें दर्शन ।
संकेतें बोलिलें मन । घालून पाहिजे ॥ १९ ॥
चित्त अपान जिव्हा शिस्न । रसविषये आप जाण ।
पुढें ऐका सावधान । पृथ्वीचें रूप ॥ २० ॥
अहंकार प्राण घ्राण । गुद गंधविषये जाण ।
ऐसे केलें निरूपण । शास्त्रमतें ॥ २१ ॥
ऐसा हा सूक्ष्म देहे । पाहातां होईजे निसंदेहे ।
येथें मन घालून पाहे । त्यासीच हें उमजे ॥ २२ ॥
ऐसें सूक्ष्म देहे बोलिलें । पुढें स्थूळ निरोपिलें ।
आकाश पंचगुणें वर्तलें । कैसें स्थुळीं ॥ २३ ॥
काम क्रोध शोक मोहो भये । हा पंचविध आकाशाचा अन्वये ।
पुढें पंचविध वायो । निरोपिला ॥ २४ ॥
चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन ।
हें पंचविध लक्षण । प्रभंजनाचें ॥ २५ ॥
क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे तेजाचे पंचविध गुण ।
आतां पुढें आपलक्षण । निरोपिलें पाहिजे ॥ २६ ॥
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हा पंचविध आपाचा भेद ।
पुढें पृथ्वी विशद । केली पाहिजे ॥ २७ ॥
अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पृथ्वीचे पंचविध धर्म ।
ऐसे स्थूळ देहाचें वर्म । बोलिलें असे ॥ २८ ॥
पृथ्वी आप तेज वायो आकाश । हे पांचाचे पंचविस ।
ऐसें मिळोन स्थूळ देहास । बोलिजेतें ॥ २९ ॥
तिसरा देह कारण अज्ञान । चौथा माहांकारण ज्ञान ।
हे च्यारी देह निर्शितां विज्ञान । परब्रह्म तें ॥ ३० ॥
विचारें चौदेहावेगळें केलें । मीपण तत्वासरिसें गेलें ।
अनन्य आत्मनिवेदन जालें । परब्रह्मीं ॥ ३१ ॥
विवेकें चुकला जन्म मृत्य । नरदेहीं साधिलें महत्कृत्य ।
भक्तियोगें कृत्यकृत्य । सार्थक जालें ॥ ३२ ॥
इति श्री पंचीकर्ण । केलेंचि करावें विवर्ण ।
लोहाचें जालें सुवर्ण । परिसाचेनयोगें ॥ ३३ ॥
हाहि दृष्टांत घडेना । परिसाचेन परीस करवेना ।
शरण जातां साधुजना । साधुच होइजे ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तत्वनिरूपणनाम समास आठवा ॥