Samas 1
समास 1 - समास पहिला : बहुदेवस्थाननाम
समास 1 - दशक १८
समास पहिला : बहुदेवस्थाननाम
॥ श्रीराम ॥
तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।
विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥
तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती ।
तुझें निजरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥
धन्य धन्य चतुरानना । तां केली सृष्टीरचना ।
वेद शास्त्रें भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥
धन्य विष्णु पाळण करिसी । येकांशें सकळ जीवांसी ।
वाढविसी वर्तविसी । जाणजाणों ॥ ४ ॥
धन्य धन्य भूळाशंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार ।
रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥
धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव ।
इंद्रलोकींचें वैभव । काये म्हणौनि सांगावें ॥ ६ ॥
धन्य धन्य येमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म ।
प्राणीमात्राचें वर्म । ठाईं पाडिती ॥ ७ ॥
वेंकटेंसीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती ।
वडे धिरडीं स्वाद घेती । आतळस आपालांचा ॥ ८ ॥
धन्य तूं वो बनशंकरी । उदंड शाखांचिया हारी ।
विवरविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥
धन्य भीम गोलांगुळा । कोरवड्यांच्या उदंड माळा ।
दहि वडे खातां सकळां । समाधान होये ॥ १० ॥
धन्य तूं खंडेराया । भंडारें होये पिंवळी काया ।
कांदेभरीत रोटगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥
धन्य तुळजाभोवानी । भक्तां प्रसन्न होते जनीं ।
गुणवैभवास गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥
धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।
तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ॥ १३ ॥
धन्य तूं गा क्षत्रपाळा । उदंड जना लाविला चाळा ।
भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥
रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार ।
उपासनेस बहुत नर । तत्पर जाले ॥ १५ ॥
सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
भूमंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥
नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें जाला ।
भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ॥ १७ ॥
याचा पाहावा विचार । उदंड लांबला जोजार ।
होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥
कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती ।
सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच घडे ॥ १९ ॥
कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो ।
भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २० ॥
प्राणी साभिमानें भुलले । देह्याकडे पाहात गेले ।
मुख्य अंतरात्म्यास चुकलें । अंतरीं असोनी ॥ २१
आरे या आत्मयाची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे ।
अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहींयेक ॥ २२ ॥
त्या अनुसंधानासरिसें । जळोनी जाईजे किल्मिषें ।
अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे । विवरोन पाहाती ॥ २३ ॥
अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ।
बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बहुदेवस्थाननिरूपणनाम समास पहिला ॥