Samas 9
समास ९ - समास नववा : निद्रानिरूपण
समास ९ - दशक १८
समास नववा : निद्रानिरूपण॥ श्रीराम ॥
वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विळास ।
निद्रा आलियां सावकास । जाणार नाहीं ॥ १ ॥
निद्रेनें व्यापिली काया । आळस आंग मोडे जांभया ।
तेणेंकरितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥
कडकडां जांभया येती । चटचटां चटक्या वाजती ।
डकडकां डुकल्या देती । सावकास ॥ ३ ॥
येकाचे डोळे झांकती । येकाचे डोळे लागती ।
येक ते वचकोन पाहाती । चहुंकडे ॥ ४ ॥
येक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले ।
हुडकाचे टुकडे जाले । सुधी नाहीं ॥ ५ ॥
येक टेंकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले ।
येक उताणे पसरलें । सावकास ॥ ६ ॥
कोणी मुर्कुंडी घालिती । कोणी कानवडें निजती ।
कोणी चक्रीं फिरती । चहुंकडे ॥ ७ ॥
येक हात हालविती । येक पाये हालविती ।
येक दांत खाती । कर्कराटें ॥ ८ ॥
येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं । ते नागवींच लोळों लागलीं ।
येकाचीं मुंडासीं गडबडलीं । चहुंकडे ॥ ९ ॥
येक निजेलीं अव्यावेस्तें । येक दिसती जैसीं प्रेते ।
दांत पसरुनी जैसीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
येक वोसणतचि उठिले । येक अंधारीं फिरों लागले ।
येक जाऊन निजेले । उकरड्यावरी ॥ ११ ॥
येक मडकीं उतरिती । येक भोई चांचपती ।
येक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥
येक प्राणी वोसणाती । येक फुंदफुंदों रडती ।
येक खदखदां हासती । सावकास ॥ १३ ॥
येक हाका मारूं लागले । येक बो।म्बलित उठिले ।
येक वचकोन राहिले । आपुले ठाईं ॥ १४ ॥
येक क्षणक्षणा खुरडती । येक डोई खाजविती ।
येक कढों लागती । सावकास ॥ १५ ॥
येकाच्या लाळा गळाल्या । येकाच्या पिका सांडल्या ।
येकीं लघुशंका केल्या । सावकास ॥ १६ ॥
येक राउत सोडिती । येक कर्पट ढेंकर देती ।
येक खांकरुनी थुंकिती । भलतीकडे ॥ १७ ॥
येक हागती येक वोकिती । येक खोंकिती येक सिंकिती ।
येक ते पाणी मागती । निदसुया स्वरें ॥ १८ ॥
येक दुस्वप्नें निर्बुजले । येक सुस्वप्नें संतोषले ।
येक ते गाढमुढी पडिले । सुषुप्तिमधें ॥ १९ ॥
इकडे उजेडाया जालें । कोण्हीं पढणें आरंभिलें ।
कोणीं प्रातस्मरामि मांडिलें । हरिकिर्तन ॥ २० ॥
कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति । कोणी येकांतीं जप करिती ।
कोणी पाठांतर उजळिती । नाना प्रकारें ॥ २१ ॥
नाना विद्या नाना कळा । आपलाल्या सिकती सकळा ।
तानमानें गायेनकळा । येक गाती ॥ २२ ॥
मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त जाली ।
वेवसाईं बुद्धी आपुली । प्रेरिते जाले ॥ २३ ॥
ज्ञाता तत्वें सांडून पळाला । तुर्येपैलिकडे गेला ।
आत्मनिवेदनें जाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निद्रानिरूपणनाम समास नववा ॥