Samas 1
समास 1 - समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
समास 1 - दशक १९
समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
॥ श्रीराम ॥
ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥
वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥
अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥
वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाकार ॥ ६ ॥
पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळींचे ॥ ७ ॥
कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापसुनी ॥ ८ ॥
ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥
भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणी मात्रास उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥
काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥
घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥
सुया कातया जागाईत । खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥
नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥
नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥
तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥
नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवणें ।
पेट्या कुलुपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥