Samas 2
समास २ - उत्तमलक्षण
समास २ - दशक २
॥ श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥
वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये । पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥
अति वाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये । शोधल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥
विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये । मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये । रात्री पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥
निंदा द्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये । बळात्कारें ॥ ७ ॥
वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये । विद्याअभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥
तोंडाळासि भांडों नये । वाचाळासी तंडों नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥
अति क्रोध करूं नये । जिवलगांस खेदूं नये । मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥
क्षणाक्षणां रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये । केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥
बोलिला बोल विसरों नये । प्रसंगी सामर्थ्य चुकों नये । केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसि कदा ॥ १२ ॥
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये । शोधिलुआविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥
सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासों नये । निरंतर ॥ १४ ॥
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये । पैज होड घालूं नये । काहीं केल्या ॥ १५ ॥
बहुत चिंता करूं नये । निसुगपणें राहों नये । परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये । परपीडा करूं नये । विस्वासघात ॥ १७ ॥
शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये । जणारास पुसों नये । कोठें जातोस म्हणौनी ॥ १८ ॥
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये । आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥
पत्रेंविण पर्वत करूं नये । हीनाचें रुण घेऊं नये । गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥
लटिकी जाजू घेऊं नये । सभेस लटिकें करूं नये । आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥
आदखणेपण करूं नये । अन्यायेंविण गांजूं नये । अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥
बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये । बहुत दिवस राहूं नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥
आपल्याची गोही देऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये । आपलें आपण हांसों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥
धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेवूं नये । बहुचकासीं करूं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥
कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये । आसुदें अन्न सेऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥
तोंडीं सीवी असों नये । दुसयास देखोन हांसों नये । उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥
देखिली वस्तु चोरूं नये । बहुत कृपण होऊं नये । जिवलगांसी करूं नये । कळह कदा ॥ २८ ॥
येकाचा घात करूं नये । लटिकी गोही देऊं नये । अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥
चाहाडी चोरी धरूं नये । परद्वार करूं नये । मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥
समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये । वैरियांस दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥
अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये । मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥
मूर्खासीं संमंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये । दुश्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥
स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये । अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥
हरिकथा सांडूं नये । निरूपण तोडूं नये । परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥
देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये । भलते भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥
निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये । पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥
सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये । धिःकारितां चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥
गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
अपकीर्ति ते सांडावी । सद्की्र्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥
नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण । ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तामलक्षणनाम समास दुसरा ॥ २ ॥