Samas 5
समास 5 - समास पाचवा : रजोगुणलक्षण
समास 5 - दशक २
समास पाचवा : रजोगुणलक्षण॥ श्रीराम ॥
मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥
सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥
श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥
त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥
शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो संसारिक ॥ ४ ॥
तयां संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥
रज तम आणी सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तृत्व । दाखऊं आता ॥ ६ ॥
रजोगुण येतां शरिरीं । वर्तणुक कैसी करी ।
सावध होऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥
माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥
माता पिता आणी कांता । पुत्र सुना आणी दुहिता ।
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगोण ॥ ९ ॥
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्याचें अभिळाषावें । तो रजोगोण ॥ १० ॥
कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥
नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगोण ॥ १२ ॥
धनधान्याचे संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगोण ॥ १३ ॥
मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्ये थोर- । म्हणे, तो रजोगुण ॥ १४ ॥
माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगोण ॥ १५ ॥
दुसर्या चें सर्व जावें । माझेचेंचि बरें असावें ।
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगोण ॥ १६ ॥
कपट आणी मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगोण ॥ १७ ॥
बाळकावरी ममताअ । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगोण ॥ १८ ॥
जिवलगांची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥
संसाराचे बहुत कष्ट । कैसा होईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगोण ॥ २० ॥
कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगोण ॥ २१ ॥
वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी- । करी, तो रजोगुण ॥ २२ ॥
जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगोण ॥ २३ ॥
विनोदार्थीं भरे मन । शृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगोण ॥ २४ ॥
टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगोण ॥ २५ ॥
आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगोण ॥ २६ ॥
कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षेपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगोण ॥ २७ ॥
उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥
तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्यनेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥
देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु ।
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥
गोडग्रासीं आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥
शृंगारिक तें आवडे । भक्ती वैराग्य नावडे ।
कळालाघवीं पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥
नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थी प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥
असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥
आतां रजोगुण हा सुटेना । संसारिक हें तुटेना ।
प्रपंचीं गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥
उपाये येक भगवद्भवक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥
काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥
येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥
आदिअंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥
ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥
त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥
ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥ ५ ॥