Samas 10
समास 10 - समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
समास 10 - दशक २०
समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
॥ श्रीराम ॥
धरूं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥
जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या। ॥ २ ॥
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥
जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें ।
बळें आकाशाबाहेर । कैसें जावें ॥ ४ ॥
जिकडेतिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे ।
समस्तांचें मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥
परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी ।
कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥
नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी ।
तैसें न लगे परब्रह्मासी । बैसलें ठाईं ॥ ७ ॥
प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥
पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला ।
तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥
परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।
आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं ।
पन्नगादिकपाताळलोकीं । तेथेंचि आहे ॥ १२ ॥
कासीपासून रामेश्वर । आवघें दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥
परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना ।
पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
येकसरें सन्मुक विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
येकजिनसि गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास ।
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे ।
ज्ञानदृष्टीविण नव्हे समधान ॥ २१ ॥
पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥
ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें ।
व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥
ब्रह्मासी शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥
शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥
जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥
ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥
भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥
वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मनकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥
वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतं विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥
ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥
देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥
सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें काये घावें ॥ ३५ ॥
सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥
ऐसीं हें विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विमळब्रह्मनिरूपणनाम समास दहावा ॥
दशकविसावा समाप्त ॥ श्री दासबोध ग्रंथ समाप्त ॥