Samas 2
समास 2 - समास दुसरा : सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपण
समास 2 - दशक २०
समास दुसरा : सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥
मूळमाया नस्तां चंचळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ ।
जैसें गगन अंतराळ । चहुंकडे ॥ १ ॥
दृश्य आलें आणि गेलें । परी तें ब्रह्म संचलें ।
जैसें गगन कोंदाटलें । चहुंकडे ॥ २ ॥
जिकडे पाहावें तिकडे अपार । कोणेकडे नाहीं पार ।
येकजिनसी स्वतंत्र । दुसरें नाहीं ॥ ३ ॥
ब्रह्मांडावरतें बैसावें । अवकाश भकास अवलोकावें ।
तेथें चंचळ व्यापकाच्या नांवें । सुन्याकार ॥ ४ ॥
दृश्य विवेकें काढिलें । मग परब्रह्म कोंदाटलें ।
कोणासीच अनुमानलें । नाहीं कदा ॥ ५ ॥
अधोर्ध पाहातां चहुंकडे । निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे ।
मन धांवेल कोणेकडे । अंत पाहावया ॥ ६ ॥
दृश्य चळे ब्रह्म चळेना । दृश्य कळे ब्रह्म कळेना ।
दृश्य आकळे ब्रह्म आकळेना । कल्पनेसी ॥ ७ ॥
कल्पना म्हणिजे कांहींच नाहीं । ब्रह्म दाटले ठाईंचा ठाईं ।
वाक्यार्थ विवरत जाई । म्हणिजे बरें ॥ ८ ॥
परब्रह्मायेवढें थोर नाहीं । श्रवणापरतें साधन नाहीं ।
कळल्याविण कांहींच नाहीं । समाधान ॥ ९ ॥
पिप्लीकामार्गें हळु हळु घडे । विहंगमें फळासी गांठी पडे ।
साधक मननीं पवाडे । म्हणिजे बरें ॥ १० ॥
परब्रह्मासारिखें दुसरें । कांहींच नाहीं खरें ।
निंदा आणि स्तुतिउत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥
ऐसे परब्रह्म येकजिनसी । कांहीं तुळेना तयासी ।
मानुभव पुण्यरासी । तेथें पवाडती ॥ १२ ॥
चंचळें होते दुःखप्राप्ती । निश्चळायेवडी नाहीं विश्रांती ।
निश्चळ प्रत्ययें पाहाती । माहानुभाव ॥ १३ ॥
मुळापासून शेवटवरी । विचारणा केलीच करी ।
प्रत्ययाचा निश्चयो अंतरीं । तयासीच फावे ॥ १४ ॥
कल्पनेचि सृष्टी जाली । त्रिविध प्रकारें भासली ।
तिक्षण बुद्धीनें आणिली । पाहिजे मना ॥ १५ ॥
मूळमायेपासून त्रिगुण । अवघें येकदेसी लक्षण ।
पांचा भूतांचा ढोबळा गुण । दिसत आहे ॥ १६ ॥
पृथ्वीपासून च्यारी खाणी । चत्वार वेगळाली करणी ।
सकळ सृष्टीचि चाली येथुनी । पुढें नाहीं ॥ १७ ॥
सृष्टीचें विविध लक्षण । विशद करूं निरूपण ।
श्रोतीं सुचित अंतःकर्ण । केलें पाहिजे ॥ १८ ॥
मूळमाया जाणीवेची । मुळीं सूक्ष्म कल्पनेची ।
जैसी स्थिती परे वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥
अष्टधा प्रकृतीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे ॥ २० ॥
जड पदार्थ चेतवितें तें । म्हणौन चैतन्य बोलिजेतें ।
सूक्ष्म रूपें संकेतें । समजोन घ्यावीं ॥ २१ ॥
प्रकृती पुरुषाचा विचार । अर्धनारीनटेश्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥
गुप्त त्रिगुणाचें गूढत्व । म्हणौन संकेत महत्तत्त्व ।
गुप्तरूपें शुद्धसत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥
जेथून गुण प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती ।
त्रिगुणाचीं रूपें समजती । धन्य ते साधु ॥ २४ ॥
गुप्तरूपें गुणसौम्य । म्हणौनि बोलिजे गुणसाम्य ।
सूक्ष्म संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥
मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ येकदेसी लक्षण ।
प्रत्ययें पाहातां खूण । अंतरीं येते ॥ २६ ॥
पुढें पंचभूतांचीं बंडें । वाढलीं विशाळें उदंडें ।
सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसया जिनसान्याची परी ।
दोनी जिनस याउपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥
पृथ्वी नाना जिनसाचें बीज । अंडज जारज श्वेतज उद्भिज ।
च्यारी खाणी च्यारी वाणी सहज । निर्माण जाल्या ॥ २९ ॥
खाणी वाणी होती जाती । परंतु तैसीच आहे जगती ।
ऐसे होती आणी जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सृष्टीत्रिविधलक्षणनिरूपणनाम समास दुसरा ॥