उपासना

Samas 3

समास 3 - समास तिसरा : सूक्ष्मनामाभिधाननिरूपण

समास 3 - दशक २०

समास तिसरा : सूक्ष्मनामाभिधाननिरूपण

॥ श्रीराम ॥

मुळींहून सेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।

पुन्हा विवरत विरत माघारी । वृत्ति न्यावी ॥ १ ॥

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौर्‍यासी लक्ष जीवयोनी ।

नाना प्रकारीचे प्राणी । जन्मास येती ॥ २ ॥

अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमधें जाती नासोनी ।

अनेक येती जाती परी अवनी । तैसीच आहे ॥ ३ ॥

ऐसें हें सेंड्याकडिल खांड । दुसरें भूतांचें बंड ।

तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥

स्थूळ अवघें सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें ।

गुणापासून पाहिलेच पाहावें । सूक्ष्मदृष्टीं ॥ ५ ॥

गुणाचीं रूपें जाणिव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राव ।

सूक्ष्मदृष्टीचें लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥

शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध जाणीव सत्वगुण ।

जाणीवनेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥

त्रिगुणाचीं रूपें ऐसीं । कळों लागलीं अपैसीं ।

गुणापुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥

रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व ।

तें जाणिजे महत्तत्त्व । कर्दमरूप ॥ ९ ॥

प्रकृती पुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेश्वर म्हणती ।

परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूप ॥ १० ॥

सूक्ष्मरूपें गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य ।

तैसेंचि चैतन्य अगम्य । सूक्ष्मरूपी ॥ ११ ॥

बहुजिनसी मूळमाया । माहांकारण ब्रह्मांडीची काया ।

ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥ १२ ॥

च्यारी खाणी पांच भूतें । चौदा सूक्ष्म संकेतें ।

काये पाहणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥

आहाच पाहातां कळेना । गरज केल्यां समजेना ।

नाना प्रकारीं जनाच्या मना । संदेह पडती ॥ १४ ॥

चौदा पांच येकोणीस । येकोणीस च्यारी तेविस ।

यांमधें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥

जो विवरोन समजला । तेथें संदेह नाहीं उरला ।

समजल्याविण जो गल्बला । तो निरर्थक ॥ १६ ॥

सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।

अवघें समजतां सज्ज । परमार्थ होतो ॥ १७ ॥

समजलें माणूस चावळेना । निश्चै अनुमान धरीना ।

सावळगोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥

शब्दातीत बोलतां आलें । त्यास वाच्यांश बोलिलें ।

शुद्ध लक्ष्यांश लक्षिलें । पाहिजे विवेकें ॥ १९ ॥

पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाये विलया ।

माया नस्तां मग तया । काये म्हणावें ॥ २० ॥

अन्वये आणी वीतरेक । हा पूर्वपक्षाचा विवेक ।

सिद्धांत म्हणिजे शुद्ध येक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥

अधोमुखें भेद वाढतो । ऊर्धमुखें भेद तुटतो ।

निःसंगपणें निर्गुणी तो । माहांयोगी ॥ २२ ॥

माया मिथ्या ऐसी कळली । तरी मग भीड कां लागली ।

मायेचें भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥

लटके मायेनें दपटावें । सत्य परब्रह्म सांडावें ।

मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥

पृथ्वीमधें बहुत जन । त्यामधें असती सज्जन ।

परी साधूस वोळखतो कोण । साधुवेगळा ॥ २५ ॥

म्हणौन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।

फिरफिरों ठाइं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥

उदंड हुडकावे संत । सांपडे प्रचितीचा महंत ।

प्रचितीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥

प्रपंच अथवा परमार्थ । प्रचितीविण अवघें वेर्थ ।

प्रत्ययेज्ञानी तो समर्थ । सकळांमध्यें ॥ २८ ॥

रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ ।

परलोकींच निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥

म्हणौन पाहिलेंचि पाहावें । आणि शोधिलेंचि शोधावें ।

अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सूक्ष्मनामाभिधाननिरूपणनाम समास तिसरा ॥

20px