Samas 9
समास ९ - समास नववा : सूक्ष्मनिरूपण
समास ९ - दशक २०
समास नववा : सूक्ष्मनिरूपण
॥ श्रीराम ॥
मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें ।
हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥
देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा ।
याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥
देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं ।
म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥
देव नाना शरीरें धरितो । धरुनी मागुती सोडितो ।
तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें ।
सकळ आपुले अंतःकर्णें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञाचा उपाये । समजल्याविण देतां नये ।
पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥
सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव ।
परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥
विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना ।
परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥
थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती ।
तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥
थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी ।
राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥
म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥
अज्ञासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने ।
म्हणोनि सिद्धांचिये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥
माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें ।
ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥
माया उलंघायाकारणें । देवासी नाना उपाय करणें ।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥
ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी ।
स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरूं नये ।
खोटें संग्रहीं करूं नये । कांहींयेक ॥ १६ ॥
खोटें तें खोटेंचि खोटें । खयासी तगेनात बालटें ।
मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥
अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे ।
नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥
सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें ।
मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥
सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें ।
शरीरीं विभागले । सकळ कांहीं ॥ २० ॥
काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें ।
सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावी ॥ २१ ॥
निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक ।
देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥
मूळमाया संकल्परूप । तें अंतःकर्णाचें स्वरूप ।
जड चेतवी चैतन्यरूप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥
समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य ।
सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥
द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षिणांग विचार ।
तोंचि अर्धनारीनटेश्वर । पिंडीं वोळखावा ॥ २५ ॥
तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे ।
शडगुणईश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥
तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व ।
अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणा ॥ २७ ॥
त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार ।
मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥
मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव ।
चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥
पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें ।
शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा ॥