उपासना

Samas 1

समास 1 - समास पहिला : जन्मदुःख निरूपण

समास 1 - दशक ३

समास पहिला : जन्मदुःख निरूपण

॥ श्रीराम ॥

जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।

जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥

जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।

जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥

जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ ।

जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३॥

जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।

जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४॥

जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।

जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५॥

जन्म जीवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।

जन्म लांवेचा वळसा । ममतारूप ॥ ६॥

जन्म मायेचे मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।

जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७॥

जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।

जन्म हेंचि विस्मरण । ईश्वराचें ॥ ८॥

जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।

जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९॥

जन्म हाचि विषमकाळ । जन्म हेंचि वोखटी वेळ ।

जन्म हा अति कुश्चीळ । नर्कपतन ॥ १०॥

पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।

रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥

११॥

अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।

तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥

१२॥

रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।

त्या गळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३॥

वरी वरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।

जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४॥

कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धु‍ईजेतें ।

तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता न ये ॥ १५॥

अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।

मेदमांसें सरसाविला । सांदोसाअंदीं भरूनी ॥१६॥

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरलें असे देहीं ।

नाना व्याधी दुःखें तेंहि । अभ्यांतरी वसती ॥ १७॥

नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें ।

मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥ १८॥

जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।

अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९॥

सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।

उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥

डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।

प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥२१॥

लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ ।

तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२॥

मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे ।

प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३॥

पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन ।

भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥ २४॥

एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।

येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।

जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥

निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां ।

एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥ २७॥

ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।

मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८॥

ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।

नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९॥

वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।

तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥

त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे ।

कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥

बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।

रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥

विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।

तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३॥

ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।

कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४॥

देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।

गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५॥

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।

माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६॥

नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्वारें सांडी स्वास ।

तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७॥

मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें ।

प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८॥

स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।

मार्ग दिसेनासा जाला । कासावीस ॥ ३९॥

चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरीं भरलें ।

लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४०॥

मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।

हातां पडिलें तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१॥

ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले ।

मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२॥

मृत्य पावला आपण । मतेचा घेतला प्राण ।

दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३॥

तथापी सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी ।

तर्ह्हीं आडकला जाउनी । कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥

तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।

तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५॥

बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।

तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६॥

गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।

ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७॥

दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।

सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८॥

सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।

अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥

देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबळे ।

असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५०॥

ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीमात्रांसीं ।

म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१॥

जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।

ज्ञानबळें बिरक्त । सर्वकाळ ॥ ५२॥

ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।

सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ॥ १ ॥

20px