उपासना

Samas 10

समास 10 - समास दहावा : वैराग्य निरूपण

समास 10 - दशक ३

समास दहावा : वैराग्य निरूपण॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १॥

आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी । ने‍ऊन दुःखाचे सांकडी- । माजीं घालिती ॥ २॥

अहंकारनक्रें उडविलें । ने‍ऊनि पाताळीं बुडविलें । तेथुनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥ ३॥

काम =मगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना । मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४॥

वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा । जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५॥

माथां प्रपंचाचें वोझें । घे‍ऊन म्हणे माझें माझें । बुडतांही न सोडी, फुंजे । कुळाभिमानें ॥ ६॥

पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें । आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७॥

बहुतेक आवर्तीं पडिले । प्राणी वाहातचि गेले । जेंहिं भगवंतासी बोभाईलें । भावार्थबळें ॥ ८॥

देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी । येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९॥

भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १०॥

जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें । संसारदुःख सकळ उडे । निजदासाचें ॥ ११॥

जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे । धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२॥

जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३॥

जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक । नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४॥

जैसें जयाचें भजन । तैसेंची दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५॥

दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६॥

जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंही टवकारे ॥ १७॥

भृकुटीस घालून मिठी । पाहातां क्रोधें तेंहि उठी । आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥

जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला । जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥ १९॥

भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २०॥

भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरी पावन जाले । भावार्थबळें उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१॥

आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले । कीर्तिश्रवणें जाले । अभक्त, भावार्थी ॥ २२॥

धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३॥

तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४॥

बहुतां जन्मांचे सेवटीं । जेणें चुके अटाटी । तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५॥

म्हणौन धन्य ते भाविक जन । जेंहिं जोडिलें हरिनिधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६॥

आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥

हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ । सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८॥

धरून ईश्वराची कास । केली संसाराची नैराश । तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९॥

जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परमसुख । संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३०॥

जयांचा ईश्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा । जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१॥

ते आक्षै सुखें सुखावले । संसारदुःखें विसरले । विषयेरंगी वोरंगले । श्रीरंगरंगीं ॥ ३२॥

तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्वरेंसिं साटी । येरें अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३॥

आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें । तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४॥

बहुता तपाचा सांठा । तीणें लाधला परीस गोटा । परी तो ठा‍ईंचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५॥

तैसा संसारास आला । मायाजाळीं गुंडाळला । अंतीं येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६॥

या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती । येकें बापुडी यातायाती । वरपडी जालीं ॥ ३७ ॥

या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावे संतसंगें । नीचयोनीं दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८॥

कोण समयो ये‍ईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा । जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९॥

तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैसी वेळ । पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४०॥

पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली । देह पडतांच ठेविली- । आहे नींच योनी ॥ ४१॥

स्वान शुकरादिक नीच याती । भोगणें घडे विपत्ती । तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२॥

मागा गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी । तेथुनियां थोरा कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३॥

दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें । तैचेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४॥

कैंचि माता कैंचा पिता । कैंचि बहिण कैंचा भ्राता । कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५॥

हे तूं जाण मावेचीं । आवघीं सो‍इरीं सुखाचीं । हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगाती नव्हेती ॥ ४६॥

कैंचा प्रपंच कैंचे कुळ । कासया होतोसी व्याकुळ । धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७॥

कैंचें घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार । जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८॥

कैंचें तारुण्य कैंचे वैभव । कैंचें सोहळे हावभाव । हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९॥

येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी । माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५०॥

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥

कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं । तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥

तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥

येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें । नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४॥

जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी । मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५॥

अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जिवांची लागली चिंता । मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६॥

भूमि धरिली धराधरें । प्रगट हो‍ईजे दिनकरें । ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७॥ ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव । जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८॥

ऐसा सर्वात्मा श्रीराम- । सांडून, धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९॥

रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश । माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६०॥

जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा । विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१॥

सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२॥

जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें । स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३॥

जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे । म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४॥

विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख । पूर्वीं गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ॥ ६५॥

गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे । चारा घे‍ऊन पळतां ॥ ६६॥

तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी । म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥

ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक । सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८॥

देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे । दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९॥

धडपुडी भगवत्प्राप्ती- । हो‍ऊन, चुके अधिगती । ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥ ७०॥

वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें । तेणें हो‍ईल स्वभावें । समाधान ॥ ७१॥

कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन । भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२॥

ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाऊलें । कंठ सद्गनदित, गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३॥

देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गु्रु दाता । स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

20px