Samas 6
समास 6 - समास सहावा : आध्यात्मिक ताप
समास 6 - दशक ३
समास सहावा : आध्यात्मिक ताप॥ श्रीराम ॥
तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र होऊनी ॥ १॥
जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २॥
क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन ।
बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ॥ ३॥
माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चेइला । स्वप्नदुःखी ॥ ४॥
कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५॥
रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६॥
तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७॥
ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषईं येक असे । वाक्याधार ॥ ८॥
श्लोक ॥ देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ॥ १ ॥
सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥
शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥
येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ ९॥
आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १०॥
आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा ।
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११॥
हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२॥
देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३॥
देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें ।
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४॥
देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५॥
खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजया देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ॥ १६॥
काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७॥
अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८॥
वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९॥
नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २०॥
कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१॥
वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२॥
वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३॥
दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४॥
कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५॥
जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ॥ २६॥
शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७॥
आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं ।
विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ॥ २८॥
मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें ।
खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९॥
मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३०॥
गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त ।
अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१॥
पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस ।
फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ॥ ३२॥
उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला ।
खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३३॥
उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४॥
कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५॥
गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६॥
जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७॥
कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८॥
कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९॥
फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें ।
दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४०॥
मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्हें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४१॥
तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ॥ ४२॥
दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३॥
तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४॥
संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ॥ ४५॥
उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ॥ ४६॥
सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ॥ ४७॥
नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४८॥
झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ॥ ४९॥
वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।
चुकुर होइजे मानसें । या नांव आध्यात्मिक ॥ ५०॥
नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१॥
नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥ ५२॥
वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३॥
नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४॥
ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५॥
बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥