Samas 2
समास 2 - समास दुसरा : कीर्तनभक्ती
समास 2 - दशक ४
समास दुसरा : कीर्तनभक्ती॥ श्रीराम ॥
श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।
त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥
सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।
अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥
बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।
भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥
अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।
हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥
नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।
हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥
मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।
सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥
भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥
विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।
ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥
येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।
जेणें भगवद्भkक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥
कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका ।
प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥
ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।
नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥
करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।
श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥
कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।
देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥
पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।
बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥
नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक ।
नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥
भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।
साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥
प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।
निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥
पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ।
बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥
करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।
मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥
ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।
गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥
करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।
परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥
कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे ।
नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥
सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण ।
सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥
असो वक्त्रु त्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।
वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥
सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे ।
उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥
असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।
या नांव भगवद्भंजन । दुसरी भक्ती ॥ २६॥
कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती ।
कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥
कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।
हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥
कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे ।
कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥
सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।
तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा ।
सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कीर्तनभजननिरूपणनाम समास दुसरा ॥ २॥