Samas 3
समास 3 - समास तिसरा : नामस्मरणभक्ती
समास 3 - दशक ४
समास तिसरा : नामस्मरणभक्ती॥ श्रीराम ॥
मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।
आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥
स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।
नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥
नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।
नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥
सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।
नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥
हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।
विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥
कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।
आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।
नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।
नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥
वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।
उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥
आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा ।
प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥
भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिर्ह्हो ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥
नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।
नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥
बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।
सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥
नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर ।
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥
उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठाउठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।
नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।
माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥
परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।
नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥
सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।
नाम स्मरतां पुण्यश्लोक । होईजे स्वयें ॥ २०
कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।
माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।
हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥
म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।
तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नामस्मरणभक्तिनिरूपणनाम समास तिसरा ॥ ३॥