उपासना

Samas 6

समास 6 - समास सहावा : वंदनभक्ती

समास 6 - दशक ४

समास सहावा : वंदनभक्ती॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १॥

साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन ।

संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २॥

सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार ।

सद्गुारूस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३॥

साष्टांग नमस्कारास अधिकारु । नानाप्रतिमा देव गुरु ।

अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४॥

छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती ।

तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५॥

पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती ।

तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमे । म विशेष ॥ ६॥

श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा ।

एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥

भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।

सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७॥

वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वज्जन ।

याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८॥

जेथें दिसती विशेष गुण । तें सद्गु रूचें अधिष्ठान ।

याकारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९॥

गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती ।

नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १०॥

सर्व देवांस नमस्कारिलें । ते येका भगवंतास पावलें ।

येदर्थीं येक वचन बोलिलें- । आहे, तें ऐका ॥ ११॥

श्लोक ॥ आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।

सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥

याकारणें सर्व देवांसी । नमस्कारावें अत्यादरेंसीं ।

अधिष्ठान मानितां, देवांसी- । परम सौख्य वाटे ॥ १२॥

देव देवाचीं अधिष्ठानें । सत्पात्रें सद्गुारूचीं स्थानें ।

या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३॥

नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।

नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥

नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती ।

नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥

सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड ।

याकारणें अखंड । देव भक्त वंदावे ॥ १६॥

नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।

नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरीं ॥ १७॥

निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।

आणी मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८॥

नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण ।

नमस्कारें जन्ममरण । दुरी दुर्ह्हावे ॥ १९॥

परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।

तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २०॥

याकारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें ।

नमस्कारें प्राणीयातें । सद्बु द्धि लागे ॥ २१॥

नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे ।

नमस्कारांस कांहींच नलगे । उपकर्ण सामग्री ॥ २२॥

नमस्कारा ऐसें नाहीं सोपें । नमस्कार करावा अनन्यरूपें ।

नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३॥

साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।

सुगम पंथे ने‍ऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥

याकारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ ।

येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

वंदनभक्तिनाम समास सहावा ॥ ६॥

20px