उपासना

Samas 1

समास 1 - समास पहिला : गुरुनिश्चय

समास 1 - दशक ५

समास पहिला : गुरुनिश्चय

॥ श्रीराम ॥

जय जज जी सद्‌गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा ।

अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥

जें वेदांस सांकडें । जें शब्दासि कानडें ।

तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २॥

जें योगियांचें निजवर्म । जें शंकराचें निजधाम ।

जें विश्रांतीचें निजविश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३॥

तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणचि हो‍ईजे आंगें ।

दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना सर्वथा ॥ ४॥

आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें ।

सांगिजेती तेणें प्रमाणें – । मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥

गुरु तों सकळांसी ब्राह्मण । जर्ह्हीं तो जाला क्रियाहीन ।

तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावें ॥ ६॥

अहो या ब्राह्मणाकारणें । अवतार घेतला नारायेणें ।

विष्णूनें श्रीवत्स मिरविणें । तेथें इतर ते किती ॥ ७॥

ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्रांचे ब्राह्मण ।

धातुपाषाणीं देवपण । ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥

मुंजीबंधनेंविरहित । तो शूद्रचि निभ्रांत ।

द्विजन्मी म्हणोनि सतंत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।

वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥

ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें ।

कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥

ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत ।

पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥

ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । हो‍ऊन, जडे भगवंतीं ।

ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥

लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण ।

परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥

असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती ।

जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥

अंत्येज शब्दज्ञाता बरवा । परी तो ने‍ऊन कायी करावा ।

ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तों न घडे कीं ॥ १६॥

जें जनावेगळें केलें । तें वेदें अव्हेरिलें ।

म्हणोनि तयासि नाम ठेविलें । पाषांडमत ॥ १७॥

असो जे हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विस्वास ।

ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८॥

ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्‌गुरु करावा ।

ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्‌गुरुविण नाहीं ॥ १९॥

स्वधर्मकर्मी । म् पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्‌गुरुविण ।

ब्रह्मज्ञान नस्तां सीण । जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥

सद्‌गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।

अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१॥

ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें ।

म्हणौनि सद्गुरूचीं पा‍ऊलें । सुधृढ धरावीं ॥ २२॥

जयास वाटे देव पाहावा । तेणें सत्संग धरावा ।

सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३॥

नाना साधनें बापुडीं । सद्‌गुरुविण करिती वेडीं ।

गुरुकृपेविण कुडकुडीं । वेर्थचि होती ॥ २४॥

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।

गोरांजनें धूम्रपानें । साधिती पंचाग्नी ॥ २५॥

हरिकथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण ।

सर्व तीर्थें परम कठिण । फिरती प्राणी ॥ २६॥

झळफळित देवतार्चनें । स्नानें संध्या दर्भासनें ।

टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥

अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें । मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें ।

नाना प्रकारीचीं उपकर्णें । साहित्यशोभा ॥ २८॥

घंटा घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती ।

आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥

पंचायेत्न पूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें लाखोली ।

बेलें नारिकेळें भरिली । संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥

उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म ।

फळचि पावती, वर्म- । चुकले प्राणी ॥ ३१॥

येज्ञादिकें कर्में केलीं । हृदईं फळाशा कल्पिली ।

आपले इछेनें घेतली । सूति जन्मांची ॥ ३२॥

करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास ।

रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥ ३३॥

तरी सद्‌गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित ।

येमेपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ३४॥

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती ।

गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५॥

ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ती भाव आणी भजन ।

सकळहि फोल ब्रह्मज्ञान – । जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥

सद्‌गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे ।

जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणी गडधरां ॥ ३७॥

जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान ।

तैसें सद्‌गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८॥

सद्‌गुरुविण जन्म निर्फळ । सद्‌गुरुविण दुःख सकळ ।

सद्‌गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९॥

सद्‌गुरुचेनि अभयंकरें । प्रगट हो‍ईजे ईश्वरें ।

संसारदुःखें अपारें । नासोन जाती ॥ ४०॥

मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर ।

तयांसहि ज्ञानविज्ञानविचार । सद्‌गुरुचेनी ॥ ४१॥

श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अतितत्पर गुरुभजनीं ।

सिद्ध साधु आणी संतजनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२॥

सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक ।

तेहि सद्गुपदीं रंक । महत्वा न चढेती ॥ ४३॥

असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सद्‌गुरु करावा ।

सद्‌गुरुविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥

आतां सद्‌गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे ।

जयांचे कृपेनें प्रकाशे । शुद्ध ज्ञान ॥ ४५॥

त्या सद्गुरूची वोळखण । पुढिले समासीं निरूपण ।

बोलिलें असे श्रोतीं श्रवण । अनुक्रमें करावें ॥ ४६॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयनाम समास पहिला ॥ १॥

20px