उपासना

Samas 10

समास 10 - समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण

समास 10 - दशक ५

समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण ॥ श्रीराम ॥

मागां बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक । ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १॥

सन्मार्ग तोचि जीवीं धरणें । अन्मार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २॥

कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । संसारिकां त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३॥

प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला । तरीच पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४॥

त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५॥

ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयतांस घडे सांग । निस्पृहास बाह्य त्याग । विशेष आहे ॥ ६॥

संसारिका ठा‍ईं ठा‍ईं । बाह्य त्याग घडे कांहीं । नित्य नेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७॥

फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे । पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८॥

मागां झालें निरूपण । साधकाची ओळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९॥

साधु वस्तु होऊनि ठेला । संशयें ब्रह्मांडाबाहेरी गेला । निश्चयें चळेना ऐसा झाला । या नांव सिद्ध ॥ १०॥

बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण । मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११॥

साधकासि संदेहवृत्ति । पुढें होतसे निवृत्ती । या कारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२॥

संशयरहित ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण । सिद्धाआंगीं संशयो हीन । लागेल कैसा ॥ १३॥

कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशय कालवला । सर्वांमध्यें संशयो भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४॥

संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५॥

व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव । व्यर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांही ॥ १६॥

व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ । व्यर्थ संशयाचा परमार्थ । निश्चयेंवीण ॥ १७॥

व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ संशयाची प्रीती । व्यर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८॥

व्यर्थ संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९॥

व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती । व्यर्थ संशयाची गती । निश्चयेंविण ॥ २०॥

व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ संशयाचा पक्ष । व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१॥

व्यर्थ संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित । व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण ॥ २२॥

व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता । व्यर्थ संशयाचा ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥

निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं । व्यर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४॥

निश्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचाळपणें । निरर्थक ॥ २५॥

असो निश्चयेंविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना । संशयें काहीं समाधाना । उरी नाहीं ॥ २६॥

म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान । तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्चयेंसीं ॥ २७॥

तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय करावा कवण । मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८॥

ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवांचा वळसा । करूंचि नये ॥ २९॥

जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें परमेश्वर । ओळखावा ॥ ३०॥

मुख्य देव तो कोण । भक्तांचें कैसें लक्षण । असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१॥

आपुल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पहावें । संग त्यागून रहावें । वस्तुरूप ॥ ३२॥

तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्चयो । पहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३॥

पूर्वपक्षें सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत । मग पावावा निवांत । निश्चयो देवाचा ॥ ३४॥

देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो । चळों नेदावा निश्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५॥

सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान । आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६॥

आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी । याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७॥

आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची । अहमात्मा हें कधींची । विसरों नये ॥ ३८॥

निरोपिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसी गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९॥

आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें । मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४०॥

सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१॥

देहसमंधाचेनि गुणें । लक्षणासि काये उणें । देहातीतांचीं लक्षणें । काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२॥

जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं । निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंसीं ॥ ४३॥

लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठा‍ईंची निर्गुण । तेंचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरूप ॥ ४४॥

तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक पाचवा समाप्त ॥

20px