उपासना

Samas 2

समास 2 - समास दुसरा : गुरुलक्षण

समास 2 - दशक ५

समास दुसरा : गुरुलक्षण॥ श्रीराम ॥

जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणिजेती ।

परंतु सद्‌गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १॥

सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें ।

नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २॥

सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ।

दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३॥

साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान ।

नाना वाद्यें सिकविती जन । तेहि येक गुरु ॥ ४॥

विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी ।

कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५॥

जो यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर ।

तेहि गुरु परी साचार- । सद्‌गुरु नव्हेती ॥ ६॥

आपली माता आणी पिता । तेहि गुरुचि तत्वतां ।

परी पैलापार पावविता । तो सद्‌गुरु वेगळा ॥ ७॥

गाईत्रीमंत्राचा इचारू । सांगे तो साचार कुळगुरु ।

परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८॥

जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानांधारें निरसी ।

जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९॥

विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत ।

तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्‌गुरु ॥ १०॥

भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी ।

केली, देखोनि सीघ्र सोडी । तो सद्‌गुरु जाणावा ॥ ११॥

प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें ।

ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्‌गुरु जाणावा ॥ १२॥

वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी ।

तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुारु जाणावा ॥ १३॥

गर्भवास अति सांकडी । इछाबंधनाची बेडी ।

ज्ञान दे‍ऊन सीघ्र सोडी । तो सद्‌गुरु स्वामी ॥ १४॥

फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार ।

तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५॥

जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्मचि करी रोकडें ।

फेडी संसारसांकडे । वचनमात्रें ॥ १६॥

जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी ।

शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गांरवचनें ॥ १७॥

वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव ।

तोचि येक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८॥

संदेह निःशेष जाळी ॥ स्वधर्म आदरें प्रतिपाळी ।

वेदविरहित टवाळी । करूंच नेणे ॥ १९॥

जें जें मन अंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी ।

तो गुरु नव्हे, भिकारी- । झडे आला ॥ २०॥

शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन ।

ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥

जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी ।

इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्‌गुरु जाणावा ॥ २२॥

येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले ।

अतिदुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥

जें जें रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी ।

ऐसी कामना पापिणी । पडली गळां । २४॥

जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु ।

चोरटा मंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५॥

जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी ।

आणी सेखीं भीड करी । घातघेणा ॥ २६॥

तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा ।

भीड करूनियां, गोवा- । घाली बंधनाचा ॥ २७॥

जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन ।

तोचि सद्‌गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८॥

देखणें दाखविती आदरें । मंत्र फु । म्किती कर्णद्वारें ।

इतुकेंच ज्ञान, तें पामरें- । अंतरलीं भगवंता ॥ २९॥

बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण ।

तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥

अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता ।

ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१॥

जैसा निरूपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो ।

कृतबुद्धीचा जयो । जालाच नाहीं ॥ ३२॥

निरूपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी ।

नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३॥

पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत ।

आणी सामर्थ्यहि अद्भुतत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥

ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ ।

ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५॥

निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे ।

दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥

बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।

कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७॥

निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत ।

अवघ्यांवेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८॥

अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा ।

तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९॥

सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्त्व आलें ।

तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४०॥

सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इछिती ते मूर्ख ।

कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥

ईश्वरेंविण जे कामना । तेणींचि गुणें नाना यातना ।

पावती, होती पतना- । वरपडे प्राणी ॥ ४२॥

होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात ।

सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३॥

म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु ।

तोचि सद्‌गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४॥

मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५॥

याहीवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।

विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषईं ॥ ४६॥

याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण ।

जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥

जेथें सारासारविचार । तेथें होये जगोद्धार ।

नवविधा भक्तीचा आधार । बहुता जनासी ॥ ४८॥

म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन ।

हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥

अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन ।

तेथें बहु भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५०॥

नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।

कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१॥

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन ।

कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥

यामधें येक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे ।

म्हणौन सर्वहि विलसे । सद्‌गुरुपासीं ॥ ५३॥

तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।

नाना साधनें समर्था । सद्‌गुरुपासीं ॥ ५४॥

साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुतां सवेंच भ्रष्टे ।

याकारणे दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५॥

आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती ।

जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६॥

कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव ।

तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७॥

नीच यातीचा गुरु । तोही कानकोंड विचारु ।

ब्रह्मसभेस जैसा चोरू । तैसा दडे ॥ ५८॥

ब्रह्मसभे देखतां । त्याचें तीर्थ नये घेतां ।

अथवा प्रसाद सेवितां । प्राश्चित पडे ॥ ५९॥

तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली ।

गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६०॥

गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्वतां ।

तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥

ऐसीं सांकडीं दोहींकडे । तेथें प्रस्तावा घडे ।

नीच यातीस गुरुत्व न घडे । याकारणें ॥ ६२॥

तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें ।

बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥

आतां असो हा विचारू । स्वयातीचा पाहिजे गुरु ।

नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥

जे जे कांहीं उत्तम गुण ॥ तें तें सद्गुरूचें लक्षण ।

तथापि संगों वोळखण । होये जेणें ॥ ६५॥

येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु ।

येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६॥

येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु ।

येक असद्‌गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७॥

येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु ।

येक बोलिजे जगद्गुपरु । सकळकळा ॥ ६८॥

ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु ।

ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९॥

येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु ।

येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७०॥

जे जे यातीचा जो व्यापारु । ते ते त्याचे तितुके गुरु ।

याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१॥

असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु ।

परी जो मोक्षदाता सद्‌गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२॥

नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण ।

हें सद्गुरूचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

गुरुलक्षणनाम समास दुसरा ॥ २॥

20px