Samas 3
समास 3 - समास तिसरा : शिष्यलक्षण
समास 3 - दशक ५
समास तिसरा : शिष्यलक्षण॥ श्रीराम ॥
मागां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १॥
सद्गुरुविण सच्छिष्य । तो वायां जाय निशेष ।
कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरु सिणे ॥ २॥
उत्तमभूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडखाद ।
कां तें उत्तम बीज परी समंध । खडकेंसि पडिला ॥ ३॥
तैसा सच्छिष्य तें सत्पात्र । परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र ।
तेथें अरत्र ना परत्र । कांहिंच नाहीं ॥ ४॥
अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी ।
भाअग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५॥
तैसें येकाविण येक । होत असे निरार्थक ।
परलोकींचें सार्थक । तें दुर्ह्हावे ॥ ६॥
म्हणौनि सद्गुरु आणी सच्छिष्य । तेथें न लगती सायास ।
त्यां उभयतांचा हव्यास । पुरे येकसरा ॥ ७॥
सुभूमि आणी उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण ।
तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ॥ ८॥
सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें ।
साधनेंविण तैसें जालें । साधकांसी ॥ ९॥
जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे ।
पीक आलियांहि, उगें- । राहोंचि नये ॥ १०॥
तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें ।
येक वेळ उदंड जेविलें । तर्ह्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥
म्हणौन साधन अभ्यास आणी सद्गुरु । सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु ।
सत्कर्म सद्वासना, पारु- । पाववी भवाचा ॥ १२॥
सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणी स्वधर्म ।
सत्संग आणी नित्य नेम । निरंतर ॥ १३॥
ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान निवळे ।
नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदाईं ॥ १४॥
येथें शब्द नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्गुरुपासीं ।
सद्गुरु पालटी अवगुणासी । नाना येत्नें करूनी ॥ १५॥
सद्गुरुचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्गुरु न पालटे ।
कां जें थोरपण तुटे । म्हणौनिया ॥ १६॥
याकरणें सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे ।
नाहिं तरी होईजे । पाषांडा वरपडे ॥ १७॥
येथें सद्गुरुचि कारण । येर सर्व निःकारण ।
तथापि सांगो वोळखण । सच्छिष्याची ॥ १८॥
मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥
शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ ।
शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २०॥
शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत ।
शिष्य पाहिजे नेमस्त । सर्वप्रकारीं ॥ २१॥
शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥ २२॥