उपासना

Samas 4

समास 4 - समास चौथा : उपदेशलक्षण

समास 4 - दशक ५

समास चौथा : उपदेशलक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें । सांगतां तें असाधारणें । परी कांहीं येक सांगों ॥ १॥

बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती । येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २॥

शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र । अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३॥

मछकूर्मवर्ह्हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र । भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४॥

भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र । नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५॥

शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमन्त्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे ॥ ६॥

बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र । बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७॥

पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८॥

पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी । तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९॥

असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा । विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १०॥

कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती । कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११॥

ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं । जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२॥

येक शिव शिव सांगती । । येक हरि हरि म्हणविती । येक उपदेशिती । विठल विठल म्हणोनी ॥ १३ ॥

येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्ण विष्ण । येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४॥

येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत । येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५॥

येक सांगती राम राम । येक सांगती ऒं ऒं म । येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६॥

येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्वरु । येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७॥

येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज । येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८॥

येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव । येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९॥

येक विश्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती । येक ते जप करविती । तुका‍ई तुका‍ई म्हणौनी ॥ २०॥

हें म्हणौनी सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें । इछेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१॥

येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी । येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२॥

येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी । येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३॥

येक संगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग । येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥ २४॥

येक तपें सांगती । येक अजपाअ निरोपिती । येक तत्वें विस्तारिती , तत्वज्ञानी ॥ २५॥

येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण । येक उपदेशिती तीर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६॥

येक माहावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती । येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनी ॥ २७॥

येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती । येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८॥

येक सांगती वशीकर्ण । स्तंबन मोहन उच्चाटण । नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९॥

ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती । ऐसे हे उपदेश असती । असंख्यात । ३०॥

ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेविण निरार्थक । येविषईंs असे येक । भगवद्वचन ॥ ३१॥

श्लोक ॥ नानाशास्त्रं पठेल्लोको नाना दैवतपूजनम् । आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ शैवशाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मताः । अपभ्रंशसमास्ते । अपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥

श्लोक अर्थ- नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात. पण अर्जुना, आत्मज्ञानावाचून ही सर्व कर्मे वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व आणखी अनेक मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिप्रशच जाणावा. या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीही नाही.

याकारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे अन्न । म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२॥

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश । येविषईंs जगदीश । बहुतां ठा‍ईं बोलिला ॥ ३३॥

श्लोक ॥ यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् । तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ॥

श्लोक अर्थ- माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल, तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो.

आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा । प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४॥

सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती । त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५॥

श्लोक: ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् । तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥ श्लोक अर्थ- पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत, तेथे खान, दान इत्यादी केल्याचे जे फळ आहे, त्याच्या कोटिपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ आहे.

म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेशनाम समास चौथा ॥ ४ ॥

20px