उपासना

Samas 5

समास 5 - समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण

समास 5 - दशक ५

समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण

॥ श्रीराम ॥

जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं निर्फळ । ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १ ॥

ज्ञान म्हणतां वाटे भस्म । काये रे बा असेल वर्म । म्हणौनि हा अनुक्रम । सांगिजेल आतां ॥ २ ॥

भूत भविष्य वर्तमान । ठा‍ऊकें आहे परिछिन्न । यासीहि म्हणिजेत ज्ञान । परी तें ज्ञान नव्हे ॥ ३ ॥

बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान । वैदिक शास्त्र वेदाधेन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४ ॥

नाना वेवसायाचें ज्ञान । नाना दिक्षेचें ज्ञान । नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५ ॥

नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा । नाना नरांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ६ ॥

नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा । नाना स्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७ ॥

नाना पशूंची परीक्षा । नाना पक्षांची परीक्षा । नाना भूतांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८ ॥

नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा । नाना शस्त्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ९ ॥

नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा । नाना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १० ॥

नाना पाषाण परीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा । नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११ ॥

नाना भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा । नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२ ॥

नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा । नाना अंकुर परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३ ॥

नाना पुष्पांची परीक्षा । नाना फळांची परीक्षा । नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४ ॥

नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा । नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १५॥

नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा । नाना मूर्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १६ ॥

नाना क्षत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा । नाना पात्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १७ ॥

नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा । नाना तर्कांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १८ ॥

नाना अनुमान परीक्षा । नाना नेमस्त परीक्षा । नाना प्रकार परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १९ ॥

नाना विद्येची परीक्षा । नाना कळेची परीक्षा । नाना चातुर्य परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २० ॥

नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थांची परीक्षा । नाना भाषांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २१ ॥

नाना स्वरांची परीक्षा । नाना वर्णांची परीक्षा । नाना लेक्षनपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २२ ॥

नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा । नाना वृत्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २३ ॥

नाना रूपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा । नाना सुगंधपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २४ ॥

नाना सृष्टींची परीक्षा । नाना विस्तारपरीक्षा । नाना पदार्थपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २५ ॥

नेमकेचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें । सीघ्रचि कवित्व करणें । हें ज्ञान नव्हे ॥ २६ ॥

नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा । स्वरपालवी संकेतकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २७ ॥

काव्यकुशळ संगीतकळा । गीत प्रबंद नृत्यकळा । सभाच्यातुर्य शब्दकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २८ ॥

वग्विळास मोहनकळा । रम्य रसाळ गायनकळा । हास्य विनोद कामकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २९ ॥

नाना लाघवें चित्रकळा । नाना वाद्यें संगीतकळा । नाना प्रकारें विचित्र कळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३० ॥

आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा । चौदा विद्या सिद्धि सकळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३१ ॥

असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- । म्हणोंचि नये ॥३२ ॥

हें ज्ञान होयेसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें । जेथें प्रकृतीचें पिसें । समूळ वाव ॥ ३३ ॥

जाणावें दुसर्याचें जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४ ॥

माहानुभाव माहाभला । मानसपूजा करितां चुकला । कोणी येकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५ ॥

ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासि परम ज्ञाता म्हणती । परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६ ॥

बहुत प्रकारींची ज्ञानें । सांगों जातां असाधारणें । सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७ ॥

तरी तें कैसें आहे ज्ञान । समाधानाचें लक्षण । ऐसें हें विशद करून । मज निरोपावें ॥ ३८ ॥

ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिले समासीं निरोपिलें । श्रोतां अवधान दिधलें । पाहिजे पुढें ॥ ३९ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पाचवा ॥ ५॥

20px