उपासना

Samas 6

समास 6 - समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण

समास 6 - दशक ५

समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण

॥ श्रीराम ॥

ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ॥ १॥

मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २॥

जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे । समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३॥

मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ॥ ४॥

जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान । विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५॥

सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६॥

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७॥

जेथें सर्वचि नाहीं ठा‍ईंचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचें । म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥

ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणौनि शुद्ध ज्ञान सतंत । वेगळेंचि असे ॥ ९॥

ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण । या नांव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १०॥

माहावाक्यौपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला । तेथीचा तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११॥

माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥

माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां । त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥

माहावाक्याशें विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांचें आपण । वस्तुच आहे ॥ १४॥

आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ । जें आदि‍अंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५॥

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणि सकळही जेथें आटे । तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६॥

मतें आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें । अतिसूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७॥

जे या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८॥

शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान । या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९॥

आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥

मी कोण ऐसा हेत- । धरून, पाहातां देहातीत । आवलोकितां नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१॥

असो पूर्वीं थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार- । पावले, ते साचार । ऐक आतां ॥ २२॥

व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी । जनकादिक माहाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३॥

वामदेवादिक योगेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर । शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४॥

सनकादिक मुख्यकरूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५॥

सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६॥

जें वेदशास्त्रांचें सार । सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७॥

साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें संगिजेल आतां ॥ २८॥

तीर्थें व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें । पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९॥

सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ । जेणें संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥

छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१॥

जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२॥

पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मर्ह्हाष्ट ग्रंथीं । हृदईं वसल्या कृपामुर्ती । सद्‌गुरु स्वामी ॥ ३३॥

आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदईं वसे ॥ ३४॥

न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रेत्नेंविण सौरस । सद्‌गुरुकृपा ॥ ३५॥

ग्रंथ मात्र मर्ह्हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६॥

त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाहीं । जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगटजाला ॥ ३७॥

असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाहि मथितार्थ । अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८॥

अरे गहनाचेंही गहन । तें तूं जाण सद्‌गुरुवचन । सद्‌गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९॥

सद्‌गुरुवचन तोचि वेदांत । सद्‌गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्‌गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४०॥

जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन । जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१॥

तें हें माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतों तुज । जरी अवधान देसी मज ॥ तरी आतां येच क्षणीं ॥ ४२॥

शिष्य म्लान्वदनें बोले । धरिले सदृढ पाउले । मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३॥

अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्ये । तोही सांगतों, ऐक्य- । गुरुशिष्य जेथें ॥ ४४॥

ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । ये विषईं= संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५॥

नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६॥

निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें । प्रकृति पुरुष जीयें । तेही ब्रह्म होती ॥ ४७॥

दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८॥

सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता । पिंड ब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठें ॥ ४९॥

ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५०॥

मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे । सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥

असो गुरूचे ठा‍ईं अनन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता । वेगळेंपणें अभक्ता । उरोंचि नको ॥ ५२॥

आतां हेंचि दृढीकर्ण- । व्हावया, करीं सद्‌गुरुभजन । सद्‌गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥

या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥

देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा । देहाभिनानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५॥

असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६॥

कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७॥

शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें । तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८॥

अखंड घडे श्रवणमनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥

शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसीं इंद्रियें बाष्कळ । तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६०॥

विषईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें । मणी टाकितांचि लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१॥

मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनिया तयाचा । मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२॥

ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३॥

म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या । तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४॥

सन्यपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५॥

तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञानाउषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६॥

मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७॥

मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें । मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८॥

मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी । जागा जालियां तयासी । भयेंचि नाहीं॥ ६९॥

परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगी काविरें । पूर्ण जागृती श्रवणद्वारें- । मननें करावी ॥ ७०॥

जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण । जो विषईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१॥

जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें । तेणें साधन करावें । थोरीव सांडुनी ॥ ७२॥

साधन न मने जयाला । तो सिद्धपणे बद्ध जाला । त्याहूनि मुमुक्ष भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३॥

तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण । साधक सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४॥

याचें उत्तर श्रोतयांसी । दिधलें पुढिलीये समासीं । सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरूपणनाम समास सहावा ॥ ६ ॥

20px