उपासना

Samas 7

समास 7 - समास सातवा : बद्धलक्षण

समास 7 - दशक ५

समास सातवा : बद्धलक्षण ॥ श्रीराम ॥

सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार । परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १॥

ऐक तयांचें लक्षण । चत्वार ते कोण कोण । बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ २॥

यां चौघांविरहित कांहीं । सचराचरीं पांचवा नाहीं । आतां असो हें सर्वही । विशद करूं ॥ ३॥

बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षाचें लक्षण । साधकसिद्धवोळखण । कैसी जाणावी ॥ ४॥

श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध । मुमुक्ष साधक आणि सिद्ध । पुढें निरोपिले ॥ ५॥

आतां बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा । चक्षुविण दाही दिशा । सुन्याकार ॥ ६॥

भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी । पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥

न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्माधर्म । न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८॥

तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र । सन्मार्ग जो कां पवित्र । तो ही न दिसे ॥ ९॥

न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार । न कळे कैसा परोपकार । दानपुण्य ॥ १०॥

नाहीं पोटीं भूतदया । नाहीं सुचिष्मंत काया । नाहीं जनासि निववावया । वचन मृद ॥ ११॥

न कळे भक्ति न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान । न कळे मोक्ष न कळे साधन । या नांव बद्ध ॥ १२॥

न कळे देव निश्चयात्मक । न कळे संतांचा विवेक । न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३॥

न कळे परमार्थाची खूण । न कळे अध्यात्मनिरूपण । न कळे आपणासि आपण । या नांव बद्ध ॥ १४॥

न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनाचें फळ । न कळे तत्वतां केवळ । या नांव बद्ध ॥ १५॥

न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण । न कळे वस्तु विलक्षण । या नांव बद्ध ॥ १६॥

न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला । न कळे संकल्पें बांधला । या नांव बद्ध ॥ १७॥

जयासि नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण । तीर्थ व्रत दान पुण्य । कांहींच नाहीं ॥ १८॥

दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मित्रि नाहीं । शांति नाहीं क्ष्मा नाहीं । या नांव बद्ध ॥ १९॥

जें ज्ञानविशिं उणें । तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें । बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २०॥

नाना प्रकारीचे दोष- । करितां, वाटे परम संतोष । बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१॥

बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद । बहु द्वंद बहु खेद । या नांव बद्ध ॥ २२॥

बहु दर्प बहु दंभ । बहु विषये बहु लोभ । बहु कर्कश बहु अशुभ । या नांव बद्ध ॥ २३॥

बहु ग्रामणी बहु मत्सर । बहु असूया तिरस्कार । बहु पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४॥

बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा । बहु कुकर्माचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५॥

बहु कापट्य वादवेवाद । बहु कुतर्क भेदाभेद । बहु क्रूइर कृपामंद । या नांव बद्ध ॥ २६॥

बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिळाष । बहु प्रकारीचे दोष । या नांव बद्ध ॥ २७॥

बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट येकंकार । बहु आनित्य अविचार । या नांव बद्ध ॥ २८॥

बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी । तपीळ कुविद्या अनेकी । या नांव बद्ध ॥ २९॥

बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनर्थी । बहु डा‍ईक दुर्मती । या नांव बद्ध ॥ ३०॥

बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना । बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥ ३१॥

बहु विकल्पी बहु विषादी । बहु मूर्ख बहु समंधी । बहु प्रपंची बहु उपाधी । या नांव बद्ध ॥ ३२॥

बहु वाचाळ बहु पाषंडी । बहु दुर्जन बहु थोतांडी । बहु पैशून्य बहु खोडी । या नांव बद्ध ॥ ३३॥

बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम । बहु विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४॥

बहु कृपण बहु खंदस्ती । बहु आदखणा बहु मस्ती । बहु असत्क्रिया व्यस्ती । या नांव बद्ध ॥ ३५॥

परमार्थविषईं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान । नेणे स्वयें समाधान । या नांव बद्ध ॥ ३६॥

परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर । संसारभार जोजार । या नांव बद्ध ॥ ३७॥

सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी । देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥ ३८॥

हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥

नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी । चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४०॥

काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण । द्रव्यदारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥ ४१॥

इंद्रियें करून निश्चळ । चंचळ हो‍ऊं नेदी पळ । द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥ ४२॥

द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ । द्रव्य दारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥ ४३॥

वेर्थं जा‍ऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४॥

नाना चिंता नाना उद्वेग । नाना दुःखाचे संसर्ग । करी परमार्थाचा त्याग । या नांव बद्ध ॥ ४५॥

घटिका पळ निमिष्यभरी । दुश्चीत नव्हतां अंतरीं । सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६॥

तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ति कथा निरूपण । मंत्र पूजा जप ध्यान । सर्वही द्रव्य दारा ॥ ४७॥

जागृति स्वप्न रात्रि दिवस । ऐसा लागला विषयेध्यास । नाहीं क्षणाचा अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८॥

ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षपणीं पालटे जाण । ऐक तेही वोळखण । पुढिलीये समासीं ॥ ४९॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्धलक्षणनाम समास सातवा ॥ ७॥

20px