उपासना

Samas 8

समास 8 - समास आठवा : मुमुक्षलक्षण

समास 8 - दशक ५

समास आठवा : मुमुक्षलक्षण॥ श्रीराम ॥

समास आठवा : मुमुक्षलक्षण ॥ श्रीराम ॥

संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें । जयाचेनि मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १॥

ऐसा प्रणी जो कां बद्ध । संसारीं वर्ततां अबद्ध । तायस प्राप्त जाला खेद । काळांतरीं ॥ २॥

संसारदुःखें दुखवला । त्रिविधतापें पोळला । निरूपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३॥

जाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास । म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४॥

प्रपंच जा‍ईल सकळ । येथील श्रम तों निर्फळ । आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५॥

ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली । म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६॥

पूर्वी नाना दोष केले । ते अवघेचि आठवले । पुढें ये‍उनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७॥

आठवे येमाची यातना । तेणें भयेचि वाटे मना । नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८॥

नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर । आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९॥

आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले । देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १०॥

निंदे ऐसे नाहीं दोष । तें मज घडले कीं विशेष । माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११॥

नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत । नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२॥

पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें । मन अव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३॥

नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार । नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४॥

भक्तिमाता हे बुडविली । शांति विश्रांति मोडिली । मूर्खपणें म्यां विघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५॥

आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक । पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६॥

कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा । कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७॥

नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला । दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८॥

कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं । आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९॥

पोटीं धरूनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान । अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २०॥

वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले । माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारींचे ॥ २१॥

सत्य तेंचि उछेदिलें । मिथ्य तेंचि प्रतिपादलें । ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें ॥ २२॥

ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला । तोचि मुमुक्ष बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३॥

पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी । विरक्त जाला संसारीं । या नांव मुमुक्ष ॥ २४॥

गेले राजे चक्रवर्ती । माझें वैभव तें किती । म्हणे धरूं सत्संगती । या नांव मुमुक्ष ॥ २५॥

आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । आपणासि निंदी दुःखें । या नांव मुमुक्ष ॥ २६॥

म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी । म्हणे मी काये अनाचारी । या नांव मुमुक्ष ॥ २७॥

म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ । म्हणे मी पापी केवळ । या नांव मुमुक्ष ॥ २८॥

म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन । म्हणे मी जन्मलो पाषाण । या नांव मुमुक्ष ॥ २९॥

म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं । म्हणे मी नाना वेसनी । या नांव मुमुक्ष ॥ ३०॥

म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर । म्हणे मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्ष ॥ ३१॥

म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ । म्हणे मी कुबुद्धि कुटीळ । या नांव मुमुक्ष ॥ ३२॥

म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें । आपलीं वर्णी कुलक्षणें । या नांव मुमुक्ष ॥ ३३॥

म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्चिळ अघोरी । म्हणे मी नीच नानापरी । या नांव मुमुक्ष ॥ ३४॥

म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी । या नांव मुमुक्ष ॥ ३५॥

म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी । म्हणे मी भार जालों भूमीसी । या नांव मुमुक्ष ॥ ३६॥

आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास । धरी सत्संगाचा हव्यास । या नांव मुमुक्ष ॥ ३७॥

नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं । नाना ग्रन्थांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८॥

तेणें नव्हे समाधान । वाटे अवघाच अनुमान । म्हणे रिघों संतांस शरण । या नांव मुमुक्ष ॥ ३९॥

देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान । सांडूनि, संतचरणीं अनन्य- । या नांव मुमुक्ष ॥ ४०॥

अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी । मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्ष ॥ ४१॥

ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थाकारणें झिजे । संतापा‍ईं विश्वास उपजे । या नांव मुमुक्ष ॥ ४२॥

स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा । अंकित हो‍ईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३॥

ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें वोळखिजे । पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥ ८॥

20px